Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचाराचं सत्र सुरुच, चार जण जखमी तर एकाचा मृत्यू झाल्याचा ITLF चा दावा
Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचाराचं सत्र सुरुच असून एक समूहाने अनेक घरांची तोडफोड केल्याचं समोर आलं आहे.
Manipur Violence: मणिपूरमध्ये (Manipur) शांत होण्याची चिन्ह अजूनही दिसत नाही. मणिपूरमधील चुराचांदपूरमध्ये गुरुवारी (27 जुलै) पुन्हा एका कुकी आणि मेतई समाजामध्ये हिंसाचार (Violence) झाल्याची माहिती मिळत आहे. या हिंसाचारामध्ये चार जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. इंडिजिनस ट्राइबल लीडर्स फोरम (ITLF) यांनी केलेल्या दाव्यानुसार, या हिंसाचारामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळत आहे. तसेच कुकी समाजातील काही लोकांनी सुरक्षा रक्षकांवर देखील हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. तर यावेळी सुरक्षा रक्षकांनी देखील या लोकांना चोख उत्तर दिल्याचं सांगण्यात येत आहे.
माहितीनुसार, गुरुवारी (27 जुलै) रोजी कांगवाई, क्वाकटा, फुगाकचाओ इखाई आणि तेरखोंगशांगबी भागात गोळीबार करण्यात आला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी देखील तात्काळ घटनास्थळी पोहचले. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तात्काळ त्या गावकऱ्यांची सुटका देखील केली. परंतु तरीही त्या ठिकाणी गोळीबार सुरुच होता. ही घटना ताजी असतानाच बुधवारी (26 जुलै) काही लोकांनी घरांची तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे. या लोकांनी घरांची तोडफोड करुन त्यांनी नंतर ती घरे जाळून देखील टाकली. त्यानंतर सुरक्षा दल आणि हल्लेखोरांमध्ये गोळीबार सुरू झाला.
मणिपूर पोलिसांनी दिली जखमींची माहिती
दरम्यान, मणिपूर पोलिसांनी या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या लोकांसंदर्भात माहिती दिली आहे. यावर बोलतांना पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी (27 जुलै) रात्री उशिरापर्यंत दहशतवाद्यांनी सीमा भागात गोळीबार केला. या गोळीबारात जखमी झालेल्या लोकांना इंफाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मणिपूरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर गृह मंत्रालयाकडून कठोर कारवाई करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. तर राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 35 हजार अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
तसेच महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी शुक्रवार (28 जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी देखील पार पडणार आहे. तसेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान सुरु आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसेच संसदेत देखील या मुद्द्यावर काही तोडगा निघणार का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी सद्या प्रशासन कसोशीचे प्रयत्न करताना दिसत आहे.