(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manipur Violence: मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण; सीबीआय करणार तपास, व्हिडीओ शूट करणारा अटकेत
Manipur Violence: मणिपूरमधील महिलांवर झालेल्या त्या अत्याचाराचा तपास सीबीआय करणार आहे. पीडित महिलांचा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
Manipur Violence: मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल (Manipur Viral Video) झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) करणार आहे. त्याशिवाय, या प्रकरणाची सुनावणी राज्याबाहेर चालवण्यासंदर्भात केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. गृह मंत्रालयाने (MHA) हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे.
मणिपूरमधील महिलांचा व्हायरल व्हिडिओ ज्या मोबाईलवरून शूट करण्यात आला होता, तो फोन जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय, व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका उच्च सरकारी सूत्राने गुरुवारी (27 जुलै) दिली असल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने कुकी आणि मैतेई समुदायाच्या सदस्यांशी चर्चा केल्यात. प्रत्येक समुदायासोबत केंद्र सरकारने सहा फेऱ्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालय मैतेई आणि कुकी या दोन्ही समुदायाच्या नेत्यांच्या संपर्कात आहे. मणिपूरमध्ये सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. कुकी ते मैतई दरम्यान बफर झोन तयार करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मणिपूरमध्ये परिस्थिती सुधारली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये 35,000 अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले असून 18 जुलैनंतर हिंसाचाराची कोणतीही मोठी घटना घडलेली नाही. मणिपूरच्या परिस्थितीवर पंतप्रधान मोदीदेखील लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान मोदी दररोज गृहमंत्र्यांच्या माध्यमातून मणिपूरची माहिती घेत आहेत. औषध आणि दैनंदिन साहित्याचा तुटवडा नाही. अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आहेत. मोठ्या संख्येने सरकारी कर्मचारी कामावर परतत आहेत आणि शाळाही पुन्हा सुरू होत असल्याचे वृत्त आहे.
3 मे रोजी उसळला होता हिंसाचार
मैतेई समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीच्या निषेधार्थ मणिपूरमध्ये 3 मे रोजी हिंसाचार उसळला होता. कुकी आणि मैतेई समुदायांमधील वांशिक हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या आठवड्यात, मणिपूरमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली होती. या व्हायरल व्हिडीओवरून देशभरात खळबळ उडाली होती.
ही घटना 4 मे रोजी घडली होती. या महिलांची विवस्त्र धिंड काढल्यानंतर त्यांच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या घटनेवरून बराच गदारोळ झाला. व्हिडिओ समोर आल्यानंतर मणिपूर पोलिसांनी मुख्य आरोपीसह काहींना अटक केली आहे.