Maharashtra Political Crisis : आसाममधील शिवसेनेच्या आमदारांना बंगालला पाठवा, त्यांचा योग्य पाहुणचार करू; ममता बॅनर्जी यांचा भाजपला टोला
Mamata Banerjee: भाजप आता सत्तेचा दुरुपयोग करून इतर पक्ष फोडत आहे, एक दिवस त्यांच्यावरही ही वेळ येईल असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
कोलकाता: आसाममधील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना पश्चिम बंगालला पाठवा, त्यांचा योग्य पाहुणचार करु असा टोला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला लगावला आहे. सत्तेचा गैरवापर करुन भाजपने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रातील उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलं.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "असैंविधानिक मार्गाने भाजपकडून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज भाजप सत्तेत आहे, त्यांच्याकडे अधिकार आणि पैसा आहे. भाजपकडून पैसा, सत्ता आणि माफियांचा वापर करुन पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. हे जे काही सुरू आहे ते चुकीचं आहे. पण एक दिवस तुम्हालाही सत्तेतून पायउतार व्हावं लागेल. त्यावेळी तुमचाही पक्ष कोणीतरी फोडेल. आसाममधल्या हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवून द्या, त्यांचा योग्य पाहुणचार करू."
आसाममध्ये पूरस्थिती असतानाही महाराष्ट्रातल्या आमदारांना तिकडे पाठवण्यात आलं. त्या ठिकाणच्या लोकांचा भाजप विचार करत नाही असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करून 42 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. यामागे भाजप असून या बंडखोर गटाला भाजपकडूनच आर्थिक रसद पुरवली जात असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांच्या सोबत गुवाहाटी येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहेत. आजच राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे आणि संजय राठोड गुवाहाटीला पोहोचले असून ते एकनाथ शिंदे गटात सामिल झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
संजय राऊत यांचे बंडखोरांना आवाहन
शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी असे आवाहन राऊत यांनी दिले. चर्चेतून मार्ग निघू शकतो, चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र! असं ट्वीट संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांसाठी केले आहे.