(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Load Shedding : लोडशेडिंगमुळे काय होतंय? इथे तर चक्क सख्ख्या भावांची नवरीच बदलली अन् पुढे असं झालं...
Madhya Pradesh : लग्नाला सुरुवात झाली आणि लाईट गेली, त्यानंतर नवरीचीच बदली झाली. नंतर ज्येष्ठ लोकांनी यामध्ये भाग घेत चूक सुधारली.
भोपाळ: लोडशेडिंगच्या प्रश्नामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, लोक अगदी हैराण झाले आहेत. पण मध्य प्रदेशमध्ये लोडशेडिंगमध्ये असं काही घडलंय की त्यामुळे सगळेच गोंधळून गेले. एकाच मांडवात दोन भावांचे लग्न सुरू असताना लाईट गेली आणि चक्क नवरीची अदालाबदली झाली. तशाच परिस्थितीत ते लग्न लागलं आणि नंतर ही चूक सर्वांच्या लक्षात आली.
मध्य प्रदेशातील उज्जेन शहराच्या जवळ ही घटना घडली आहे. डांगवाडा गावातील दोन भावांचे असलाना गावातील दोन बहिणींशी लग्न ठरलं होतं. त्यासाठी वरातही या गावात आली होती. हे लग्न रात्रीच्या वेळी होणार होतं, पण नेमकं त्या वेळी लाईट गेली. तशाही स्थितीमध्ये हे लग्न पार पडलं आणि वरात पुन्हा डांगवाडा या ठिकाणी पोहोचली.
मग झालं...या लोडशेडिंगचा मोठा फटका हा या जोडप्यांना बसल्याचं सर्वांनाच लक्षात आलं. मोठ्या भावाचं ज्या मुलीसोबत लग्न होणार होतं त्या मुलीसोबत लहान भावाने सात फेरे घेतले होते. तर लहान भावाचं ज्या मुलीसोबत लग्न ठरलं होतं तिच्यासोबत मोठ्या भावाने लग्न केलं होतं. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला.
चूक सुधारली, पुन्हा लग्न लावलं
लोडशेडिंगमुळे ही गोष्ट घडल्याचं लक्षात येताच सर्वजन पुन्हा एकदा जवळच्या मंदिरात पोहोचले. आधी ठरल्याप्रमाणे त्यांनी या जोडप्यांची पुन्हा एकदा लग्न लावली आणि विषय संपवून टाकला.
मध्य प्रदेशमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग सुरू आहे. त्याचा फटका हा शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्व वर्गाला बसत आहे. पण या लोडशेडिंगचा फटका असाही बसेल आणि नवरीचीच आदलाबदल होईल हे कुणाच्या ध्यानीमनी नव्हतं. उगाच घरातील आणि गावातील ज्येष्ठ लोक समजदार... आणि महत्त्वाचं म्हणजे ते दोन सख्खे भाऊ समजदार म्हणून प्रकरण निभावून गेलं. अन्यथा या लोडशेडिंगमुळे सख्खे भाऊ पक्के वैरी झाले असते हे नक्की.
महत्त्वाच्या बातम्या: