Ludhiana Gas Leak Incident : पंजाबच्या लुधियानात विषारी वायूची गळती, नऊ जणांचा मृत्यू, 11 जण बेशुद्ध; एक किमीपर्यंतचा परिसर सील
Ludhiana Gas Leak Incident : पंजाबमधील लुधियानामध्ये आज (30 एप्रिल) सकाळी मोठी दुर्घटना घडली. ग्यारसपुरा परिसरात विषारी वायूच्या गळतीमुळे नऊ जणांचा मृत्यू झाला, तर 11 जण आजारी पडले आहेत.
Ludhiana Gas Leak Incident : पंजाबमधील (Punjab) लुधियानामध्ये (Ludhiana) आज (30 एप्रिल) सकाळी मोठी दुर्घटना घडली. ग्यारसपुरा परिसरात विषारी वायूच्या गळतीमुळे (Gas Leak) नऊ जणांचा मृत्यू झाला, तर 11 जण बेशुद्ध पडले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. वायू गळती ग्यारसपुरामधील एका रहिवासी इमारतीत सकाळी सव्वासातच्या सुमारास झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. तर अग्निशमन विभागाच्या मदतीने बेशुद्ध झालेल्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून एक किलोमीटपर्यंतचा परिसर सील केला असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
#WATCH पंजाब: लुधियाना के ग्यासपुरा इलाके में गैस रिसाव की घटना सामने आई है। मौके पर NDRF की टीम पहुंच गई है और बचाव अभियान जारी है। pic.twitter.com/ILjXIO3KOY
— ANI_HindiNews (@AHindinews) April 30, 2023
या इमारतीत दुधाचं केंद्र होतं. सकाळी दूध घेण्यासाठी गेलेले नागरिक बेशुद्ध झाले आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली. वायू गळती झालेल्या इमारतीच्या 300 मीटरच्या आत लोक बेशुद्ध झाले. दरम्यान कोणत्या गॅसची गळती झाली आणि त्याचं कारण काय, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
मृतांची संख्या वाढती
लुधियाना पश्चिमच्या उपविभागीय अधिकारी स्वाती यांच्या माहितीनुसार, हे गॅस गळतीचं प्रकरण आहे. एनडीआरएफची टीम लोकांना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी हजर असून त्यांनी बचाव कार्य सुरु केलं आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून 11 जण आजारी आहेत. अतिरिक्त पोलीस उपायुक्त समीर वर्मा घटनास्थळी पोहोचल्यानंतर पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, 'बेशुद्ध पडलेल्या 5 ते 6 जणांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे. हा परिसर सील करण्यात येत आहे. एनडीआरएफच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं असून बचावकार्य सुरु आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडून वायू गळतीची दखल
तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही लुधियानाच्या ग्यासपुरा इथल्या गॅस गळतीच्या घटनेची दखल घेतली आहे. "लुधियानाच्या ग्यासपुरा भागातील कारखान्यातून गॅस गळतीची घटना अत्यंत दुःखद आहे. पोलीस, सरकार आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी हजर आहे. शक्य ती सर्व मदत केली जाईल," असं मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
ਲੁਧਿਆਣਾ ਦੇ ਗਿਆਸਪੁਰਾ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਫ਼ੈਕਟਰੀ ਦੀ ਗੈਸ ਲੀਕ ਦੀ ਘਟਨਾ ਬੇਹੱਦ ਦੁੱਖਦਾਇਕ ਹੈ..ਪੁਲਿਸ, ਪੑਸ਼ਾਸਨ ਅਤੇ NDRF ਟੀਮਾਂ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਮੌਜੂਦ ਹਨ ..ਹਰ ਸੰਭਵ ਮਦਦ ਪਹੁੰਚਾਈ ਜਾ ਰਹੀ ਹੈ..ਬਾਕੀ ਵੇਰਵੇ ਜਲਦੀ..
— Bhagwant Mann (@BhagwantMann) April 30, 2023