Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये प्राण गमावलेल्या विद्यार्थ्याचे पार्थिव कर्नाटकात दाखल, मुख्यमंत्री बोम्मईंनी वाहिली श्रद्धांजली
Russia Ukraine Conflict: मुख्यमंत्र्यांनी बोम्मईंनी प्रतिक्रिया देत म्हटले की, 'नवीनची आई मृतदेह देशात आणण्यासाठी सतत विनवणी करत होती. सुरुवातीला युद्धक्षेत्रातून मृतदेह आणण्याबाबत आम्हाला शंका होती.'
Russia Ukraine Conflict : रशिया-युक्रेन युद्धात गोळीबारात प्राण गमावलेल्या नवीन या भारतीय विद्यार्थ्याचे पार्थिव सोमवारी कर्नाटकातील हावेरी या मूळ गावी पोहोचले. नवीनच्या मूळ गावी त्यांचे कुटुंबीय अंत्यदर्शन घेत आहेत. त्यानंतर नवीनचा मृतदेह एसएस हॉस्पिटलमध्ये दान करण्यात येणार आहे. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये रशियन गोळीबारात ठार झालेल्या कर्नाटकातील वैद्यकीय विद्यार्थ्याचा मृतदेह सोमवारी बंगळुरू विमानतळावर पोहोचला. खार्किव नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीतील वैद्यकीय अंतिम वर्षाचा विद्यार्थी नवीन शेखरप्पा ग्यानगौदार याचा 1 मार्च रोजी युद्धमय भागात मृत्यू झाला.
बंगळुरु विमानतळावर पोहोचले होते कुटुंबीय
नवीनचे कुटुंबीय, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि इतर काही जण मृतदेह घेण्यासाठी बंगळुरू विमानतळावर पोहोचले होते. यानंतर मृतदेह नवीनच्या मूळ गावी, हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नूर तालुक्यातील चालगेरी गावात नेण्यात आला. बोम्मई म्हणाले की, नवीनला युद्ध क्षेत्रात आपला जीव गमवावा लागला हे दुर्दैवी आहे.
नवीनची आई सतत करत होती विनवणी
मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, 'नवीनची आई मृतदेह देशात आणण्यासाठी सतत विनवणी करत होते. सुरुवातीला युद्धक्षेत्रातून मृतदेह आणण्याच्या शक्यतेबाबतही आम्हाला शंका होती. हे एक कठीण काम होते, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचंड मुत्सद्दी क्षमतेने पूर्ण केले.'
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे मानले आभार
युक्रेनमधील हजारो विद्यार्थ्यांना मायदेशी आणल्याबद्दल पंतप्रधान परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि इतर अधिकार्यांचे आभार मानताना बोम्मई म्हणाले की, बहुतेक वेळा युद्ध क्षेत्रातून आपल्या सैनिकांचे मृतदेह आणणे अशक्य असते. सर्वसामान्य नागरिकाचा मृतदेह आणणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही. नवीनच्या आई-वडिलांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर दावणगेरे येथील खासगी रुग्णालयात मृतदेह दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत नवीन कोरोना रुग्णांमध्ये 12 टक्क्यांनी घट, 1549 नवीन रुग्ण आणि 31 मृत्यू
- Uttarakhand CM : कोण होणार उत्तराखंडचे मुख्यमंत्री? राजनाथ सिंह करणार नावाची घोषणा, धामीसह हे दिग्गज नेते शर्यतीत
- Viral Video : रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत होता मुलगा, नेटकरी करतायत सलाम, कारण ऐकून व्हाल थक्क
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha