Karnataka Hijab Row : कर्नाटकात हिजाब वाद पुन्हा चिघळला, महाविद्यालयाकडून 23 विद्यार्थिनी निलंबित
Karnataka Hijab Row : गेल्या आठवड्यात दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर तालुक्यातील मुली हिजाब घालून कॉलेजमध्ये आल्या होत्या. या विद्यार्थीनींनी वर्गात हिजाब घालण्याची परवानगी देण्याची मागणी करत आंदोलन केले होते.
Karnataka Hijab Row : कर्नाटकातील हिजाब घालण्याचा मुद्दा पुन्हा चिघळला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही मुस्लिम मुली तो मानायला तयार नाहीत. त्यामुळे उप्पिनगडी शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने 23 विद्यार्थिनींना निलंबित केले आहे. या मुलींनी मागील आठवड्यात वर्गांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागितली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर तालुक्यातील मुली हिजाब घालून कॉलेजमध्ये आल्या होत्या. या विद्यार्थीनींनी वर्गात हिजाब घालण्याची परवानगी देण्याची मागणी करत आंदोलन केले होते. त्यामुळे सीडीसीने सोमवारी बैठक घेऊन या विद्यार्थीनींना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. हिजाब घालून महाविद्यालयात आल्याबद्दल समितीने यापूर्वी सात विद्यार्थिनींना निलंबित केले होते.
कधी सुरू झाला हिजाब वाद?
या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कर्नाटकात हिजाब वरून आंदोलने झाली होती. त्यावेळी उडुपी जिल्ह्यातील एका सरकारी मुलींच्या महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींनी आरोप केला की त्यांना हिजाब परिधान केल्यामुळे वर्गात जाण्यापासून रोखण्यात आले. आंदोलनादरम्यान, काही विद्यार्थिनींनी दावा केला की, हिजाब परिधान केल्यामुळे त्यांना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. फेब्रुवारीमध्ये सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालये आठवडाभर बंद केली होती. त्यानंतर हिजाबचा वाद देशातील इतर राज्यांमध्येही पसरला होता. हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात गेल्यांतर न्यायालयाने त्यावर निकाल देखील दिला आहे.
काय होता हायकोर्टाचा निर्णय?
इस्लाममध्ये हिजाब घालणे ही एक आवश्यक धार्मिक प्रथा नाही. धर्मस्वातंत्र्य हे घटनेच्या कलम 25 अंतर्गत वाजवी निर्बंधांच्या अधीन आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. याबरोबरच मुस्लिम विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब घालण्याची मागणी करण्यासाठी दाखल केलेल्या याचिका देखील उच्च न्यायालयाने 16 मार्च रोजी फेटाळल्या होत्या. शिवाय वर्गात फक्त शाळेचा गणवेश घालण्याची परवानगी असेल, असे न्यायालयाने म्हटले होते.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.