(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karnataka CM Siddaramaiah: कर्नाटकाच्या मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेसच्या पाच आश्वासनांवर शिक्कामोर्तब, मुख्यमंत्री सिद्धारमय्या काय म्हणाले?
Karnataka CM Siddaramaiah: कर्नाटकाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काँग्रेसने निवडणुकांदरम्यान दिलेली आश्वासनं या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Karnataka CM Siddaramaiah: कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या (CM Siddaramaiah) यांनी म्हटलं की, 'काँग्रेसने निवडणुकीदरम्यान दिलेली पाच आश्वासनं या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत.' शुक्रवारी (2 जून) रोजी कर्नाटक मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी म्हटलं की, 'निवडणुकीच्या आधी आणि त्यादरम्यान आम्ही पाच आश्वासन जनतेला दिली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि मी आश्वासन पत्रांवर सही देखील केली होती आणि ही सगळी आश्वासनं पूर्ण करुन त्यांनी लोकांपर्यंत पोहचवण्याचा विश्वास देखील आम्ही दिला होता. तेव्हा आम्ही या आश्वासन पत्रांचे वाटप देखील केले होते.'
काँग्रेसचा मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. त्यांनंतर खातेवाटप देखील करण्यात आले होते. त्यामुळे आता कर्नाटक मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला हा निर्णय महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे.
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेली पाच आश्वासनं
प्रत्येक घरात 200 युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा करण्यात येईल. (गृह ज्योति योजना)
प्रत्येक कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. (गृह लक्ष्मी योजना)
दारिद्र्यरेषे खालील कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दरमहा 10 किलो मोफत तांदूळ (अन्न भाग्य योजना)
दोन वर्षांपासून 18 ते 25 वर्षांतील पदवीधर प्रत्येक बेरोजगार तरुणाला दरमहा तीन हजार रुपये आणि डिप्लोमा केलेल्या प्रत्येक बेरोजगार तरुणाला दरमहा 1500 रुपये देण्यात येणार (युवा निधी योजना)
सार्वजनिक बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा (शक्ती योजना)
कोणत्या योजनेची कधी सुरुवात होणार?
मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी म्हटलं की, 'अन्न भाग्य योजनेअंतर्गत 1 जुलैपासून दारिद्र्यरेषे खालील सर्व शिधापत्रिका धारकांना दहा किलो तांदूळ मोफत देण्यात येतील'. तसेच 'गृहलक्ष्मी योजना ही 15 ऑगस्टपासून सुरु करण्यात येईल', असं मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी म्हटलं. 'कोणत्याही जाती-धर्माचा भेदभाव न करता या पाच निर्णयांना आमलात आणण्यात यावे' असं मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी मंत्रिमंडळ बैठकीत म्हणाले आहेत. शक्ती योजनेअंतर्गत एक जून पासून सर्व महिलांना कर्नाटकातील सार्वजनिक बसमधून मोफत प्रवास करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
काँग्रेसने निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आलेल्या विचारांमुळे कर्नाटकातील जनतेला लाभदायी सुविधा मिळणार असल्याचं आता म्हटलं जात आहे. तसेच काँग्रेसच्या या निर्णायांचा फायदा काँग्रेसला इतर राज्यातील निवडणुकांमध्ये होणार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.