Bihar Political Crisis : नितीश कुमार यांचा भाजपला दे धक्का, बिहारमध्ये महागठबंधन, बुधवारी शपथविधी
Bihar Political Crisis : बिहारमध्ये महागठबंधन सरकारचा बुधवारी दुपारी चार वाजता शपथविधी होणार आहे.
Bihar Political Crisis : बिहारमध्ये महागठबंधन सरकारचा बुधवारी दुपारी चार वाजता शपथविधी होणार आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. मंगळवारी भाजपसोबत फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत हातमिळवणी करत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. नितीश कुमार यांनी राज्यपालांना 164 आमदारांच्या समर्थनाचं पत्र दिले आहे. एनडीएसोबत काडीमोड घेत नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धक्का दिल्याचं सांगितलं जातंय. भाजप-जेडीयू सरकारला दोन वर्षेही पूर्ण झाली नाहीत, तोपर्यंत हे सरकार पडलं आहे.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. यावेळी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, 'राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच नव्या सरकार स्थापनेचा दावा केला आहे. आमच्याकडे सात पक्षाचा पाठिंबा आहे. यामध्ये लेफ्ट आणि जीतन राम मांझी यांच्या पक्षाचा समावेश आहे.' यावेळी तेजस्वी यादव म्हणाले की, भाजपकडे कुणाचंही समर्थनाही. भाजप ज्या पक्षांसोबत हातमिळवणी करतो, त्याच पक्षाला संपवण्याचं काम करण्यात येतं, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. पंजाब आणि महाराष्ट्रात काय झालं ते तुम्ही पाहिले आहे. भाजपसोडून सर्व पक्षांनी आज नितीश कुमार यांना आपला नेता म्हणून मान्य केलेय.
Bihar | JD(U)-RJD led 'Mahagathbandhan' (Grand Alliance) in Bihar to take oath at 4pm, tomorrow pic.twitter.com/OMQrcT0xYs
— ANI (@ANI) August 9, 2022
गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि भाजपमध्ये वाद सुरू होता. आता हा वाद शिगेला पोहोचला असून नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांनी या आधीही भाजपसोबत युती तोडली होती. आता त्याची पुनरावृत्ती झाली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूला कमी जागा असतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं. भाजपने उपमुख्यमंत्रीपद घेतलं होतं. त्यानंतर भाजपने नितीशकुमार यांच्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. दरम्यान, महाराष्ट्रात एकीकडे भाजप आघाडीचे सरकार सत्तेत येत असताना दुसरीकडे बिहारमधील सरकार कोसळलं आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू आणि शिवसेना हे भाजपचे जुने सहकारी आहेत. पण सध्या या दोन्ही पक्षांनी एनडीएची साथ सोडली आहे.