ABP-C Voter Survey : नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात मुख्यमंत्री कोण? बिहारच्या जनतेचा कौल कुणाला?
Bihar Political Crisis : नितीश कुमार यांनी महागठबंधन सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. या राजकीय संकटावर एबीपी न्यूजसाठी सी व्होटरनं आज सर्वेक्षण केलं आहे.
Bihar Political Crisis : बिहारमध्ये (Bihar) जेडीयूने (JDU) भाजपसोबतची (BJP) युती तोडून आरजेडीच्या (RJD) नेतृत्वाखालील महागठबंधनसोबत सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांची भाजपसोबतची युती तुटल्यानंतर बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आणि भाजपला मोठा धक्का बसला. एबीपी न्यूजसाठी सी व्होटरनं एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात बिहारमधील 1 हजार 415 लोकांनी सहभाग घेतला आहे.
या सर्वेक्षणातून एक धक्कादायक बाब समोर आली. सी-व्होटरच्या या सर्वेक्षणात नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यापैकी मुख्यमंत्री कोणी व्हावं? या प्रश्नावर सुमारे 56 टक्के लोकांनी तेजस्वी यादव यांना मत दिलं आहे. त्याचवेळी 44 टक्के लोकांनी नितीश कुमार यांचं नाव घेतलं आहे.
भाजपसोबतची युती तोडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला
नितीश कुमार यांनी काल (सोमवारी) भाजपसोबतची युती तोडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. नितीश कुमार यांनी भाजपवर जेडीयूचा अपमान करत स्वत:च्या विरोधात कट रचल्याचा आरोप केला होता. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. यानंतर महागठबंधनची बैठक झाली. ज्यामध्ये नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्यात आली. महागठबंधनच्या बैठकीत काँग्रेस (Congress) आणि डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित होते.
भाजप-जेडीयूची युती तुटली, महागठबंधनचं सरकार येणार
बैठकीनंतर नितीश कुमार आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव राजभवनात पोहोचले आणि त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. त्यांनी राज्यपाल फागू चौहान यांना 164 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केलं. नव्या सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि भाजपमध्ये वाद सुरू होता. हा वाद शिगेला पोहोचला असून नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांनी या आधीही भाजपसोबत युती तोडली होती. आता त्याची पुनरावृत्ती झाली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूला कमी जागा असतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं. भाजपनं उपमुख्यमंत्रीपद घेतलं होतं. त्यानंतर भाजपनं नितीशकुमार यांच्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सातत्यानं केला जात होता. दरम्यान, महाराष्ट्रात एकीकडे भाजप आघाडीचे सरकार सत्तेत येत असताना दुसरीकडे बिहारमधील सरकार कोसळलं आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू आणि शिवसेना हे भाजपचे जुने सहकारी आहेत. पण सध्या या दोन्ही पक्षांनी एनडीएची साथ सोडली आहे.