Jamtara Online Fraud: बाप तुरुंगात गेल्यावर मुलगा घेतो ऑनलाईन फ्रॉडची जबाबदारी; 'जामतारा गँग'ची कहाणी, ज्यांच्यासमोर आयटी इंजिनीअरही फेल!
Jamtara : भारतातील बरेच सायबर गुन्हे हे झारखंडमधील जामताराशी संबंधित असतात. फसवणूक प्रकरणात वडील तुरुंगात गेल्यानंतर मुलगा पुढील जबाबदारी सांभाळतो. शालेय शिक्षण घेतलेली मुलं देखील लोकांची ऑनलाईन फसवणूक करतात.
Jamtara : देशभरातील सायबर फसवणुकीची (Cyber Crime) चर्चा झाली की त्यात 'जामतारा' नाव पहिलं येतं. झारखंड आणि बंगालच्या सीमेवर असलेला हा जिल्हा गेल्या 5 वर्षांपासून सायबर फसवणुकीचे केंद्र बनला आहे. जामतारा येथे होत असलेल्या ऑनलाईन फसवणुकीमुळे 7 राज्यांचे पोलीसही चिंतेत आहेत. जामतारा (Jamtara) हा परिसर सायबर ठगांचा अड्डा मानला जातो.
या गावातून भारतभर जवळपास शेकडो कॉल केले जातात. त्या माध्यमातून भोळ्या भाबड्याच नव्हे, तर अगदी सुशिक्षित लोकांनाही गंडा घातला जातो. अनेक लोकांकडून बँक डिटेल्स घेतली जातात आणि क्षणार्धातच त्यांच्या अकाऊंटवरुन लाखोंची रक्कम उडवली जाते. बँकेच्या मुख्य शाखेतील मॅनेजर म्हणून संवाद साधत असलेला समोरचा व्यक्ती केवळ दहावी पास असू शकतो. या तरुणांचं शिक्षण अगदीच दहावी पास किंवा नापास इतकंच झालं असतं, पण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट यांना माहित असते.
ऑनलाईन फ्रॉडच्या वाढत्या प्रकरणांमुळे अलीकडेच दूरसंचार विभागाने बिहार-झारखंडमधील 2.5 लाख सिमकार्ड ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील बहुतांश सिम जामतारा आणि आसपासच्या परिसरात वापरली जात होती. दिल्ली पोलिसांनी मे महिन्यात जामतारा इथून 5 जणांना 21 हजार सिमकार्डसह पकडलं होतं.
झारखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 पासून जामतारा येथे सायबर गुन्ह्याच्या आरोपाखाली 170 लोकांना अटक करण्यात आली आहे. जामतारा पोलिसांनीच ही अटक केली आहे. इतर राज्यांच्या पोलिसांसोबतच्या संयुक्त छाप्यांमध्ये अटक केलेल्या आरोपींची संख्या 500 हून अधिक आहे. पोलिसांच्या छाप्यात 100 हून अधिक मोबाईल फोन आणि 300 हून अधिक सिमकार्डही जप्त करण्यात आले आहेत.
या वर्षांत जामतारा येथील 3 एसपीही बदलले आणि या सर्वांनी सायबर गुन्हेगारी मोडून काढणं हे आपलं प्राधान्य असल्याचं सांगितलं, मात्र असं असतानाही जामतारा येथील गुन्ह्यांचा नायनाट करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.
जामतारा कसे बनले सायबर गुन्ह्यांचे केंद्र ?
झारखंड-बंगाल सीमेवर असलेले जामतारा हे 1990 च्या दशकात रेल्वेचे डब्बे फोडणे, चोरी करणे आणि प्रवाशांना नशेत लुटणे यासाठी प्रसिद्ध होतं. मात्र मोबाईल आल्यानंतर जामतारा हा सायबर गुन्हेगारांचा बालेकिल्ला बनला.
सायबर गुन्हेगारांनी प्रथम OTP मॉड्यूल आणि नंतर विविध पद्धतींचा अवलंब करुन लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार झारखंडमधील 308 गावं सायबर गुन्ह्यांमध्ये सामील आहेत. येथे महिलाही आपल्या गुन्हेगार पतींना पोलिसांपासून वाचवण्यासाठी खूप मदत करतात. गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या भोपाळ पोलिसांवर जामतारामधील महिलांनी 2021 मध्ये हल्ला केला.
वडील तुरुंगात गेल्यावर मुलं सांभाळतात जबाबदारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशी अनेक प्रकरणं उघडकीस आली, ज्यामध्ये वडील तुरुंगात गेल्यानंतर मुलाने फसवणुकीची सूत्रं हाती घेतली. म्हणजेच येथे गुन्हेगारी ही परंपरेने सुरु आहे. एवढेच नव्हे, तर अटक केलेले गुन्हेगार जामीन मिळाल्यानंतर पुन्हा फसवणुकीचे काम सुरु करतात.
जामतारा गँगमुळे बिहार, यूपी, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि नवी दिल्लीचे पोलीस चिंतेत आहेत. या राज्यांमध्ये सायबर फसवणुकीची सर्वाधिक प्रकरणं नोंदवली जातात आणि ही सर्व जामताराशी जोडलेली आहेत. विशेष म्हणजे जामतारा गँगमधील सदस्य उच्चशिक्षितही नाहीत, असं असूनही ते सायबर फसवणुकीचा खेळ अगदी सहज करतात. नेटफ्लिक्सवर या सर्व प्रकरणाशी संबंधित जामतारा सीरिज देखील बनवण्यात आली आहे.
हेही वाचा:
Jamtara : जामताराच्या एका 'हॅलो' वर लोक होतात कंगाल! काय आहे जामतारा?