(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी ड्रोननं भारतीय हद्दीत टाकली शस्त्रास्त्र; पोलिसांकडून जप्त
Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रास्त्र आणि दारुगोळा असलेलं एक पॅकेट आढळून आलं आहे. पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी तात्काळ हे पॅकेट ताब्यात घेतलं आहे.
Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) पाकिस्तानी (Pakisthan) ड्रोनने भारतीय हद्दीत टाकलेली शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जम्मू-काश्मीर पोलिसांनी जप्त केली आहेत. या शस्त्रांस्त्रांमध्ये चिनी बनावटीची तीन पिस्तूल, 48 काडतुसे आणि चार चिनी बनावटीची हँड ग्रेनेड्स असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील राख बरुटिया गावाजवळ ही संशयास्पद हत्यारे सापडल्याचं सांगण्यात आलं. हे गाव पाकिस्तानी सीमेलगत आहे. पीटीआयने (PTI) याबाबतची बातमी दिली आहे.
राख बरुटिया गावातील एका निर्जन ठिकाणी झुडुपाजवळ पिवळ्या पॅकेटमध्ये काही संशयास्पद वस्तू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यावरुन प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पोलिसांनी ते संशयास्पद पॅकेट ताब्यात घेतलं. हे पॅकेट सीमेपलिकडून ड्रोनच्या सहाय्याने या परिसरात टाकण्यात आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक तज्ञांसोबत या ठिकाणी तातडीने पोहोचत ते पॅकेट ताब्यात घेतलं आणि त्याची तपासणी केली. त्यावेळी या पॅकेटमध्ये तीन पिस्तुले 48 काडतुसे आणि चार हँड ग्रेनेड्स असल्याचं आढळलं. ही सर्व शस्त्रास्त्रे चीनी बनावटीची असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. सांबा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरेंद्र चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, सर्व शस्त्रास्त्रे जप्त करुन फोरेन्सिककडे पाठवण्यात आली आहेत. पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी पोहोचल्यावर त्या संशयास्पद पॅकेटमध्ये अत्याधुनिक स्फोटके (Improvised Explosive Device IED) नसल्याची खात्री केली.
संशयास्पद पाकिस्तानी ड्रोनच्या सहाय्याने टाकण्यात आलेलं पार्सल हे सांबा जिल्ह्यातील विजयपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (All India Institute of Medical Science, Vijaypur) इमारतीचं बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणापासून अगदी जवळ आहे.
शनिवारी, राख बरुटिया आणि विजयपूर गावांच्या परिसरात एक संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन उडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सीमा सुरक्षा दलाच्या (Border Security Force) जवानांनी या ड्रोनवर गोळीबार करुन त्याला सीमेपलीकडे हुसकावलं होतं. त्यानंतर आज सोमवारी संशयास्पद ड्रोनने सांबा जिल्ह्यात शस्त्रास्त्रे टाकल्याचं उघड झालं. सांबा जिल्ह्यातील राख बरुटिया गावाजवळ सापडलेल्या शस्त्रांस्त्रानंतर या घटनेच्या तपासाने वेग घेतला आहे. राख बरुटिया गावाजवळ आज जप्त करण्यात आलेली शस्त्रास्त्रे, बीएसएफने हुसकावलेल्या ड्रोननेच टाकली आहेत की नाही, याचा तपास सुरु करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात तब्बल दोन डझनापेक्षा जास्त पाकिस्तानी ड्रोन या परिसरात बीएसएफकडून पाडण्यात आली आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा वगळता भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान, 192 किलोमीटरची सीमा आहे. यातून भारतात घातपाती कारवायांसाठी पाकिस्तानातून कुमक पाठवली जाते. त्यासाठी बहुतेक वेळा ड्रोनसारख्या साधनांचा वापर केला जातो. याआधीची अनेकवेळा पाकिस्तानकडून ड्रोनच्या सहाय्याने भारतीय हद्दीत शस्त्रास्त्रे टाकण्यात आली आहेत.