(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान, भारतीय लष्कराकडून शोध मोहीम सुरु
Jammu and Kashmir : जम्मू आणि काश्मीरमध्ये सेना आणि पोलीसांकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाया करण्यात येत आहे.
जम्मू आणि काश्मीर : जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashir) उत्तर सीमावर्ती भागामध्ये भारतीय सैन्याच्या जवानांनी दहशतवाद्यांचा (terrorists) डाव उधळून लावला. दरम्यान यावेळी भारतीय लष्कराने या कारवाईदरम्यान पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. जम्मू-कश्मीरच्या पोलिसांनी याबाबत माहिती दिली. कुपवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील मच्छल सेक्टरमध्ये चकमक सुरू झाली, ज्यामध्ये आतापर्यंत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. सध्या भारतीय लष्कराकडून शोध मोहीम सुरु आहे. सध्या यामध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांविषयी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
सध्या इतर दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरु असल्याची माहिती देण्यात आलीये. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा येथील नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांचा एक गट घुसखोरीचा कट आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला आधीच मिळाली होती. या माहितीच्या आधारे देखरेख ठेवण्यात आली होती. गेल्या आठवडाभरात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीची ही दुसरी घटना आहे.याआधी भारतीय लष्कराने उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता. पण भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचा हा डाव उधळून लावला.
जम्मू-कश्मीर मध्ये सुरक्षा संस्थांची बैठक
जम्मू काश्मीरमध्ये यावेळी हिवाळ्याची सुरुवात लवकर झाल्याचं चित्र आहे. या कालावधीमध्ये दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न केला जातो. कारण बर्फवृष्टीमुळे पर्वतीय मार्ग बंद होण्यापूर्वीच दहशतवाद्यांना खोऱ्यात प्रवेश करायचा असतो.याआधी बुधवारी (25 ऑक्टोबर) रोजी सुरक्षा अधिकार्यांची बैठक झाली, ज्यामध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी थांबवण्याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे.
दहशतवाद्यांनी 16 लाँच पॅड पुन्हा केले सक्रिय
कुपवाडाच्या केरन सेक्टरच्या भेटीदरम्यान, डीजीपी जम्मू आणि काश्मीर पोलिस म्हणाले होते की, पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांनी 16 लॉन्च पॅड पुन्हा सक्रिय केले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या या भागाच्या समोरील भागात 16 लाँच पॅड आणि काही कुरघोडी सुरु आहेत. ते सक्रियपणे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु सुरक्षा दले असा कोणताही प्रयत्न हाणून पाडतील, असं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं होतं.
सहा तासांच्या मोहीमेनंतर आणखी 3 दहशतवादी ठार
सीमेलगत सतर्क जवानांनी घुसखोर करणाऱ्या दहशतवाद्यांचा माग काढला. तेव्हाच या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर दहशतवादी आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांमध्ये चकमक झाली. सैनिकांनी केलेल्या सुरुवातीच्या गोळीबारात दोन दहशतवादी मारले गेले. त्यानंतर जवळपास सहा तास शोधमोहीम सुरु ठेवली. त्यामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. यामुळे या मोहीमेत एकूण पाच दहशतवादी ठार झालेत.