(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमित शाह यांचा प्रोफाईल फोटो का हटवला? ट्विटरने कारण सांगितलं
ट्विटरवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रोफाईल फोटो अचानक गायब झाला. यानंतर ट्विटरने तातडीने दुरुस्ती करुन फोटो पुन्हा अपडेट केला. परंतु फोटो का हटवला होता याचं कारण ट्विटरने सांगितलं आहे.
नवी दिल्ली : मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रोफाईल फोटो अचानक गायब झाला. यानंतर ट्विटरने प्रतिक्रिया दिली आहे. अनावधनाने ही चूक झाल्याची प्रतिक्रिया ट्विटरने दिली आहे. ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, "त्रुटीमुळे ग्लोबल कॉपीराईट पॉलिसी अंतर्गत ट्विटर तात्पुरतं लॉक करावं लागलं होतं. तातडीने दुरुस्ती केली असून अकाऊंट आता पूर्ववत झालं आहे."
'कॉपीराइट होल्डरच्या रिपोर्ट'नुसार अमित शाह याचा फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन काढला होता. ट्विटरवर त्यांचे 23.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. अमित शाह यांच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक केल्यावर ब्लँक पेजसह "मीडिया नॉट डिस्प्लेड. कॉपीराईट होल्डरच्या अहवालानुसार हा फोटो हटवण्यात आला आहे."
मात्र यानंतर अमित शाह यांचा फोटो पुन्हा लावण्यात आला. परंतु ट्विटरने याबाबत आणखी माहिती शेअर केलेली नाही.
केंद्र सरकारची ट्विटरला नोटीस, स्पष्टीकरणासाठी पाच दिवसांचा वेळ
भारताचा नकाशा चुकीचा दाखवल्याप्रकरणी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहित तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला नोटीस बजावून उत्तर देण्यासाठी पाच दिवसांचा अवधी दिला आहे. त्याच दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबरला ट्विटरवरुन अमित शाह यांचा प्रोफाईल फोटो अनावधनाने ब्लॉक झाल्याची घटना घडली.
केंद्र सरकारकडून ट्विटरला नोटीस ट्विटरने नकाशात लेहला जम्मू काश्मीरचा भाग दाखवला होता. भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे सांगत इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाने ट्विटरला नोटीस पाठवली. चुकीचा नकाशा दाखवून भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा अनादर केल्याबद्दल कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये? अशी विचारणा करत पाच दिवसात मंत्रालयाने ट्विटरकडून स्पष्टीकरण मागितलं.
दरम्यान, ट्विटरकडून या नोटीसला उत्तर देण्यात आलं आहे. आम्ही अजून नकाशात सुधारणा केलेली नाही, ज्यात लेह जम्मू काश्मीर नाही तर केंद्रशासित प्रदेश लडाखचा भाग दाखवायचा होता
याआधी ट्विटरने लेह हा चीनचा भाग असल्याचं सांगितलं होतं, यानंतर मंत्रालयकडून ट्विटरचे सीईओ डोर्जी यांना पत्र लिहून आक्षेप नोंदवला होता. यानंतर ट्विटरने ती चूक सुधारली होती.