ISRO Launch : इस्रोचं SSLV D2 लाँच; 'बेबी रॉकेट'मधून EOS 07 सह तीन उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण, खासियत वाचा सविस्तर...
ISRO SSLV D2 Launch : इस्रोने SSLV D2 लाँच केलं आहे. या रॉकेटमधून अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट (EOS 07) सह काही लहान उपग्रहांना पृथ्वीभोवतीच्या कक्षेत सोडण्यात आलं आहे.
ISRO SSLV D2 Launch : भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजे इस्रो (ISRO) कडून SSLV D2 रॉकेट (Small Sataellite Launch Vehicle) लाँच करण्यात आलं आहे. श्रीहरीकोटा इथून या उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडलं आहे. या रॉकेटमधून अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट (EOS 07), अमेरिकन कंपनी अँटरीसचा 'जानस 1' आणि देशभरातील विद्यार्थिनींनी बनवलेल्या 'आझादीसॅट 2' या लहान उपग्रहांना पृथ्वीभोवती 450 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आलं आहे.
इस्रोचं सर्वात छोटं रॉकेट SSLV D2
इस्रोकडून आज लघु उपग्रह प्रक्षेपक म्हणजेच सर्वात छोटं रॉकेट SSLV D2 चं दुसरं प्रायोगिक उड्डाण यशस्वीरित्या पार पडलं आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून (Satish Dhawan Space Centre) हे उपग्रह प्रक्षेपण पार पडलं आहे. विशेष म्हणजे SSLV-D2 रॉकेटचं पहिलं प्रक्षेपण अयशस्वी ठरले होतं. त्यानंतर आता या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण झालं आहे. लहान उपग्रहांना कमी वेळेत आणि कमी खर्चात अवकाशात पाठवता यावे यासाठी इस्रोतर्फे 'एसएसएलव्ही' या नव्या रॉकेटची निर्मिती करण्यात आली आहे.
#WATCH | Andhra Pradesh: ISRO launches Small Satellite Launch Vehicle-SSLV-D2- from Satish Dhawan Space Centre at Sriharikota to put three satellites EOS-07, Janus-1 & AzaadiSAT-2 satellites into a 450 km circular orbit pic.twitter.com/kab5kequYF
— ANI (@ANI) February 10, 2023
पृथ्वीच्या कक्षेत तीन नवीन सॅटेलाईट
SSLV-D2 ने तीन उपग्रह (Satellite) घेऊन अवकाशात उड्डाण केलं. यामध्ये अमेरिकन कंपनी अँटारिसचा उपग्रह जानस-1, चेन्नईचा स्पेस स्टार्टअप स्पेसकिड्झचा (SpaceKidz) उपग्रह 'आझादीसॅट 2' (AzaadiSAT-2) आणि ISRO चा उपग्रह EOS-07 यांचा समावेश आहे. हे तीन उपग्रह पृथ्वीच्या 450 किलोमीटर अंतराच्या वर्तुळाकार कक्षेत सोडले जातील.
खालच्या कक्षेतील सॅटेलाईट लाँचसाठी SSLV चा वापर
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, SSLV चा वापर 500 किलो वजनाच्या उपग्रहांना खालच्या कक्षेत सोडण्यासाठी केला जातो. SSLV रॉकेट मागणीनुसार रॉकेटच्या आधारावर किफायतशीर खर्चात उपग्रह प्रक्षेपण करण्याची सुविधा उपलब्ध करते. 34 मीटर उंच SSLV रॉकेटचा व्यास 2 मीटर आहे. हे रॉकेट एकूण 120 टन वजन घेऊन उड्डाण करु शकते.
SSLV ची खासियत काय?
SSLV देशातील पहिले छोटे उपग्रह प्रक्षेपक म्हणजे रॉकेट लाँचर आहे. पूर्वी, लहान उपग्रहांचे प्रक्षेपण पीएसएलव्ही (PSLV) रॉकेटद्वारे केलं जायचं, तर मोठ्या मोहिमांमध्ये जिओसिंक्रोनस ऑर्बिटसाठी जीएसएलव्ही (GSLV) आणि जीएसएलव्ही मार्क 3 (GSLV Mark 3) रॉकेट वापरलं जात असे. पीएसएलव्ही लाँच पॅडवर आणण्यासाठी आणि असेंबल करण्यासाठी दोन ते तीन महिने लागतात, परंतु एसएसएलव्ही (SSLV) केवळ 24 ते 72 तासांत असेंबल करता येतं. SSLV अशाप्रकारे डिझाईन केलं आहे की ते कधीही आणि कोठेही लाँच केलं जाऊ शकते, मग ते ट्रॅकच्या मागे लोड होत असेल किंवा मोबाईल लाँच व्हेईकल किंवा कोणत्याही तयार केलेल्या लाँच पॅडवरुन लाँच करता येतं.
याआधी SSLV-D1 चं यशस्वी प्रक्षेपण
इस्रोच्या 'बेबी रॉकेट'ने अर्थात एसएसएलवी-D1 ने (SSLV-D1) याआधी ऑगस्ट महिन्यामध्ये पहिलं यशस्वी उड्डाण केलं होतं. त्यावेळी ईओएस-02 (EOS-02) आणि आझादी सॅट या उपग्रहांचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं.