Delhi Election Result 2025 : दिल्लीमध्ये सत्तांतर, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत
Delhi Assembly Election Results 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीची (Delhi Election Results 2025) मतमोजणी सध्या सुरु आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीच्या आकडेवारीनूसार भाजपने यंदा दिल्लीत मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे.
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे प्राथमिक कल हाती आले आहेत. सकाळी 9.30 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनूसार, मतमोजणीच्या आतापर्यंतच्या कलानुसार, भाजप 44, आम आदमी पक्ष 24 आणि काँग्रेस पक्ष 2 जागांवर आघाडीवर आहे. दिल्लीत बहुमतासाठी 36 मॅजिक फिगर गाठणं आवश्यक आहे. त्यामुळे भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल दिसून येत आहे.
आंध्र प्रदेश, झारखंडची पुनरावृत्ती होणार?
आम आदमी पक्षाला सत्तेतून बाजूला सारण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपने दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण चांगलेच तापवले. त्यातच केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमांतून 2024 मध्ये अरविंद केजरीवाल यांना याच दारू घोटाळ्याप्रकरणी तुरुंगवास भोगावा लागला. केजरीवाल यांच्यासोबत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनाही तुरुंगात जावे लागले. 2024 मध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगवास झाला. त्यानंतर हेमंत सोरेन आणि पवन कल्याण यांना त्यांच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाल्याने विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना विजय मिळवता आला. मात्र, अरविंद केजरीवाल यांना दिल्लीमध्ये अशी सहानुभूती मिळाल्याचे दिसून येत नाही. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून उभे राहिलेल्या केजरीवाल यांचे नेतृत्व आता त्याच मुद्द्यांवर अडचणीत आले आहेत.























