(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IRCTC : मोदी सरकार आता रेल्वे प्रवाशांचा डेटा विकून 1 हजार कोटी कमावणार? काय आहे सत्य
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) प्रवाशांचा डेटा विकून पैसे कमविण्याची योजना करत आहे. रिपोर्ट्सनुसार, मोदी सरकार IRCTC डिजिटल कमाईतून 1000 कोटी रुपये कमावण्याच्या तयारीत आहे.
IRCTC : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) आपल्या प्रवाशांचा डेटा विकून पैसे कमविण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, मोदी सरकार IRCTC डिजिटल कमाईतून 1000 कोटी रुपये कमावण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे IRCTCच्या अधिकार्यांनी सांगितले की, एजन्सीकडून वैयक्तिक ग्राहकांशी संबंधित डेटाचा वापर करुन कमाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही फक्त सल्लागाराच्या नियुक्तीसंदर्भात निविदा काढली आहे, जो सध्याचे कायदे लक्षात घेऊन डेटाच्या माध्यमातून कमाईसाठी रोड मॅपचा अभ्यास करेल आणि सूचना करेल. यामध्ये कुणाच्या वैयक्तिक गोपनीयतेचा भंग होणार नाही, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.
प्रवाशांचा डेका विकून 1 हजार कोटी पदरात पाडून घेण्याची योजना
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय रेल्वेची ऑनलाइन तिकीट बुकिंग शाखा डिजिटल कमाईच्या माध्यमातून 1 हजार कोटी रुपयांनी गल्ला म्हणजेच महसूल वाढवण्याचा विचार करत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, IRCTC कडे मोठ्या प्रमाणात डिजिटल डेटा आहे, ज्यामुळे त्याच्यासाठी कमाईच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. रिपोर्ट्सनुसार, टेंडर अंतर्गत नियमांनुसार, कंपनीच्या वेबसाईट यूझर्सची वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर केली जाणार नाही.
आयआरसीटीसीने या योजनेसाठी निविदाही काढल्या
या योजनेसाठी आयआरसीटीसीने निविदाही जारी केली आहे. आता या निविदेबाबत युझर्सच्या मनात गोपनीयता आणि सुरक्षिततेशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इंटरनेट फ्रीडम फाऊंडेशनने IRCTC च्या या योजनेची माहिती ट्विटरवर शेअर केली आहे. या निविदेत आयआरसीटीसी सल्लागार नेमणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा सल्लागार त्यांना युजर्सच्या डेटाची कमाई कशी करायची याबाबत सूचना देईल.
आयआरसीटीसीने निविदेत म्हटले आहे की, युरोपियन जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन आणि पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2018 सारख्या नियमांचे सखोल विश्लेषण सल्लागाराद्वारे केलं जाईल. ज्यामध्ये कमाईचा प्रस्ताव योग्य दिशेने आहे की नाही तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या डेटा गोपनीयतेबाबत मार्गदर्शक तत्त्वांनुसार होत आहे की नाही.
IRCTC कडे युझर्सचा 100TB डेटा
IRCTC कडे 100TB पेक्षा जास्त युझर्सचा डेटा आहे. ज्यामध्ये युजर्सचे नाव, नंबर ते पत्ता असे सर्व तपशील समाविष्ट आहेत. अशा परिस्थितीत आयआरसीटीसी आणि सरकार युजर्सचे वैयक्तिक तपशील विकून पैसे कमवण्याचा विचार करत आहेत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
IRCTC तुमचा वैयक्तिक डेटा विकेल का?
कंपनी कधीही या डेटावरील नियंत्रण सोडू इच्छित नाही. IRCTC कडे असलेला 100TB डेटा कधीही विकला जाणार नाही. कारण ते विकून IRCTC फक्त एकदाच कमाई करू शकणार आहे. मात्र, कंपनीची योजना वेळोवेळी डेटा वापरून पैसे कमवण्याची आहे.
🚨ALERT: Hey train travellers, your data will soon be monetised by the govt. & that too, in the absence of a data protection legislation! @IRCTCofficial has uploaded a tender to appoint a consultant for digital data monetisation.🧵on what this means. 1/8https://t.co/YbyF0tazZi pic.twitter.com/x9vMfGlKxC
— Internet Freedom Foundation (IFF) (@internetfreedom) August 19, 2022
IRCTC असे पैसे कमवू शकते
समजा युझर ट्रेनमध्ये प्रवास करत आहे आणि जेवण ऑर्डर करण्यासाठी ई-कॅटरिंग वापरतो. हा नवीन प्लॅन लागू झाल्यानंतर, असे होऊ शकते की जेव्हा युझर ट्रेनमध्ये प्रवास करेल, तेव्हा त्याला काही ई-कॅटरिंग कंपन्यांकडून नोटिफिकेशन मिळतील, जिथून तो स्वतःसाठी जेवण ऑर्डर करू शकेल.
दुसरे म्हणजे असे देखील असू शकते की आता युझर रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी IRCTC चा वापर करतात आणि त्यानंतर ते त्यांच्या डेस्टिनेशन स्टेशनवरून घरी जाण्यासाठी कॅब बुक करतात? त्यानुसार, पुढे असे होऊ शकते की काही काळानंतर, स्टेशनवर पोहोचताच कॅबच्या सूचना किंवा कॉल येऊ लागतील.
ही आयआरसीटीसीची योजना आहे
IRCTC हा डेटा कसा वापरेल याची अद्याप पुष्टी झालेली नाही. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांना युझरचा अनुभव सुधारायचा आहे. यासोबतच ते थर्ड पार्टीसोबत डेटा शेअर करून पैसे कमवण्याचाही विचार करत आहे. इंटरनेट फ्रीडम फाऊंडेशन (IFF) आणि अनेक लोक IRCTC च्या या प्लॅनवरील युझर्सच्या गोपनीयतेबद्दल चिंतित आहेत.
डेटा संरक्षण कायदा नसल्याने IRCTC हा डेटा थर्ड पार्टी व्हेडर्ससोबत कसा शेअर करेल? यापूर्वी IFF नेही वाहनांच्या डेटा बेसबाबत सरकारला पत्र लिहिले आहे. युजर्सच्या डेटाचाही गैरवापर होऊ शकतो, अशी भीती आयएफएफला आहे.
IRCTC चे कोटींहून अधिक युझर्स
IRCTC हे रेल्वे तिकिटांच्या ऑनलाईन बुकिंगसाठी भारतीय रेल्वेचे एकमेव अधिकृत युनिट आहे. एवढेच नाही तर, IRCTC हे एकमेव युनिट आहे जे केटरिंग पॉलिसी 2017 अंतर्गत रेल्वे स्थानकांवर कॅटरिंग सेवा मॅनेज करण्यासाठी अधिकृत आहे.
कंपनीच्या आकडेवारीनुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात IRCTC मार्फत सुमारे 43 कोटी तिकिटे बुक करण्यात आली आहेत. यात सुमारे 63लाख डेली लॉगिन आणि ऑनलाईन सेवांचे 8 कोटी, त्याच वेळी, 46 टक्क्यांपेक्षा जास्त तिकीट बुकिंग मोबाईल अॅप्सद्वारे केले गेली आहेत.