Mahayuti: आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
Mahayuti: महायुती सरकारमध्ये मंत्री मंडळात लाडक्या आमदार बहिणींची संख्या वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आघाडीने मोठं यश मिळवलं. मोठ्या प्रमाणावर जागा जिंकून पुन्हा एकदा ते राज्यात सत्ता स्थापन करणार आहे. त्यासाठीच्या हालचाली देखील सुरू आहेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीपदे यांच्याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी देणार महायुती सरकार आता महिलांना सत्तेत वाटा देणार आहे. नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणारअसल्याची माहिती आहे. महायुती सरकारमध्ये मंत्री मंडळात लाडक्या आमदार बहिणींची संख्या वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडून यंदा विधान सभेवर 14 महिला आमदार निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या 4 तर शिवसेनाकडून 2 आमदार विधानसभेवर निवडून आल्या आहेत.
14 निवडून आलेल्या आमदारांपैकी 4 महिला आमदारांची मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या 2 टर्म पेक्षा अधिक काळ भाजपचा गड राखून ठेवलेल्या महिला आमदारांची मंत्री मंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. मंत्री पदे देण्याच्या अनुषंगाने महिला आमदारांचे प्रोफाइल दिल्लीत मागविले असल्याची माहिती आहे.
राज्यात आणलेली लाडकी बहीण योजना आता विधानसभेला निवडून आलेल्या महिला आमदारांना देखील मिळणार आहे. महायुतीतील चार पेक्षा अधिक महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये अदिती तटकरे यांचे नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे. याआधी देखील मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महिला व बालविकास खात राहिलं आहे, तर दुसरीकडे देवयानी फरांदे भाजपच्या आमदार आहेत, त्यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे. त्याचबरोबर श्वेता महाले या देखील भाजपाच्या आमदार आहेत. त्यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणखी एका महिला आमदाराचं नाव चर्चेत आहे. तर शिवसेनेकडून एक महिला आमदार नाव चर्चेत असल्याची माहिती आहे.
मंत्रिमंडळातील महिलांची संख्या वाढवण्यासाठी महायुती सरकार भर देणार असल्याची माहिती आहे. गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये एकच महिली मंत्री होती. त्यानंतर आता चार महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये जिंकून आलेल्या ज्या महिला आमदार आहेत, त्यांची संख्या वीस आहे. त्यापैकी 4 महिलांना मंत्रिपद द्यायची चर्चा आहे. महिला आमदारांचे प्रोफाइल दिल्ली दरबारी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्या नावावर चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री पद ठरल्यानंतर मंत्रिमंडळाच्या खाते वाटपावर लक्ष दिले जाईल, त्यामध्ये कोणत्या महिलांची मागणी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपच्या निवडून आलेल्या महिला आमदार
भाजपच्या सर्वात जास्त (14) महिला उमेदवार विजयी झाल्या आहे, 10 महिला आमदार या फेरनिवडून आलेल्या आहेत. यामध्ये श्वेता महाले (चिकली मतदारसंघ), मेघना बोर्डीकर (जिंतूर), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), मंदा म्हात्रे (बेलापूर), मनीषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगाव), माधुरी मिसाळ (पर्वती), मोनिका राजळे (शेवगाव) आणि नमिता मुंदडा (कैज) यांचा समावेश आहे.
तर श्रीजया चव्हाण (भोकर), सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व), स्नेहा पंडित (वसई) आणि अनुराधा चव्हाण (फुलंब्री) या भाजपच्या चार नवीन महिला आमदार विजयी झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या सुलभा खोडके (अमरावती), सरोज अहिरे (देवळाली), सना मलिक (अनुशक्तीनगर) आणि अदिती तटकरे (श्रीवर्धन) या महिल्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाच्या मंजुळा गावित (साक्री) आणि संजना जाधव (कन्नड) या दोन महिला आमदार झाल्या आहेत.
तर विरोधी पक्षात काँग्रेसच्या उमेदवार आणि खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड (धारावी) या एकमेव महिला आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.