Mumbai police : सीरियल किलर चार्ल्स शोभराजला पहिल्यांदा पकडणारा मुंबई पोलिसांतील 'तो' मराठमोळा अधिकारी! भल्या भल्यांच्या अंगावर येत असे काटा
Mumbai police : मुंबई पोलिसांतील मधुकर झेंडे असं नाव होतं, ज्यांना बघून भल्या भल्यांच्या अंगावर काटा येत असे. कुख्यात गुन्हेगार चार्ल्स शोभराजला मराठमोळ्या झेंडेंनी सर्वप्रथम बेड्या ठोकल्या होत्या.
Mumbai police : मुंबई पोलिसांतील (Mumbai Police) मधुकर झेंडे (Madhukar Zende) हे असं नाव होतं, ज्यांना बघून भल्या भल्या गुन्हेगारांच्या अंगावर काटा येत असे. सध्या नेपाळच्या (Nepal) सर्वोच्च न्यायालयाने 19 वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत असलेला फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराज (Charles Sobhraj) याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. दोन अमेरिकन पर्यटकांची हत्या केल्याच्या आरोपाखाली चार्ल्स 2013 पासून नेपाळच्या तुरुंगात आहे. हाच आंतरराष्ट्रीय कुख्यात गुन्हेगार चार्ल्स शोभराजला मराठमोळ्या पोलीस अधिकारी मधुकर झेंडेंनी 15 नोव्हेंबर 1971 रोजी सर्वप्रथम बेड्या ठोकल्या होत्या.
मधुकर झेंडेंचा मोठा पराक्रम, पिस्तुलाच्या कॉर्ड्स वापरून शोभराजला बनवलं बंदी
मधुकर झेंडे यांनी 1971 मध्ये पहिल्यांदा शोभराजला अटक केली. त्याकाळी हा मोठा पराक्रम मानला गेला होता. त्यावेळी झेंडेंच्या पराक्रमाच्या सर्वत्र चर्चा होऊ लागल्या. चार्ल्स शोभराज हा आंतरराष्ट्रीय कुख्यात गुन्हेगार आणि सीरीयल किलर होता, आपल्या युक्तीच्या जोरावर मधुकर झेंडेंनी चार्ल्स शोभराजला गोव्यात अटक केली होती. त्याच घटनेचा एक आठवणीचा किस्सा असा की, शोभराजला पकडल्यावर त्याला अटक करण्यासाठी झेंडे यांच्याकडे बेड्या नव्हत्या, त्यावेळी झेंडेंनी पिस्तुलाच्या कॉर्ड्स वापरून चार्ल्स शोभराजला बंदी बनवलं होतं.
चार्ल्स शोभराज झेंडेंना म्हणाला होता, "यु आर लकी"
तर दुसऱ्यांदा मधुकर झेंडेंनी शोभराजला 6 एप्रिल 1986 रोजी गोव्यातील बार 'क्यू इकेरो' येथे अटक केली. मधुकर झेंडेंनी दोन वेळा शोभराजला पकडलं होतं. तेव्हा त्याला बंदी बनवत झेंडेंनी म्हटलं कि, मीच तुला 15 वर्षांपूर्वी अटक केली होती. तेव्हा चार्ल्स शोभराज म्हणाला 'यु आर लकी' म्हणजेच 'तुम्ही नशीबवान आहात..'
सॅम्युअलना करायचा होता चार्ल्सचा एनकाऊंटर, झेंडेंकडून नकार
2013 साली नवी मुंबईतील वाशी येथील बांधकाम व्यावसायिक सुनील कुमार लोहारिया यांच्या हत्येचा सुत्रधार म्हणून अटक करण्यात आलेले माजी पोलीस अधिकारी सॅम्युअल अमोलिक यांच्यावर अनेक फेक एनकाऊंटरचे आरोप होते, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 1986 साली मधुकर झेंडे अमोलिकना घेऊन गोव्याला आले होते. शोभराजच्या अटकेनंतर अमोलिकने झेंडे यांना शोभराजचा एनकाऊंटर करणार असल्याचे सांगितले, पण झेंडेंनी यास साफ नकार दिला. शोभराजच्या अटकेवेळी पोलिसांना त्याच्याकडे एकही शस्त्र सापडले नव्हते, ज्याच्या आधारे पोलिसांनी शोभराजच्या एनकाऊंटरसाठी सेल्फ डिफेंसमध्ये गोळीबार केल्याची बहुचर्चित कहाणी कुणालाही पचनी पडली नसती. यामुळे शोभराजला दोनदा अटक करणाऱ्या मधुकर झेंडे यांच्यामुळे अमोलिक शोभराजचा एनकाऊंटर करू शकले नव्हते.
खुद्द पंतप्रधानांनी भेटायची इच्छा केली व्यक्त..
आंतरराष्ट्रीय कुख्यात गुन्हेगार चार्ल्स शोभराजला अटक केल्याचा मधुकर झेंडेंचा पराक्रम तेव्हा प्रचंड गाजला होता. झेंडेंनी जेव्हा शोभराजला पकडलं तेव्हा हे कठीण मिशन कोणी यशस्वी केलं ? त्या मराठमोळ्या पोलीस अधिकाऱ्याला भेटण्यासाठी खास राजीव गांधी यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी मधुकर झेंडेंचं खूप कौतुक केलं होतं.
चार्ल्स शोभराजची किशोरवयातच गुन्हेगारी
चार्ल्स शोभराज याचा जन्म व्हिएतनाममध्ये झाला. चार्ल्स शोभराज किशोरवयातच बंदूक वापरुन चोरी करायला शिकला, तेव्हाच त्याच्या गुन्हेगारी आयुष्याला खरा प्रारंभ झाला.1963 मध्ये घरफोडीच्या गुन्ह्याखाली त्याला पहिला तुरुंगवास झाला. पॅरिसजवळील एका कारागृहात असतानाच तो फेलिक्स देस्कोन नावाच्या एक तरुण श्रीमंत मुलाला भेटला. पॅरोलवर सुटल्यावर शोभराज फेलिक्ससोबत राहू लागला. फेलिक्स श्रीमंत असल्याने आता चार्ल्सचा प्रवेश पॅरिसमधल्या हाय सोसायटीत झाला होता. हळूहळू गुन्हेगारी विश्वातला त्याचा संचारही वाढू लागला. गुन्हेगारी जगतात त्याने बराच पैसा कमावला. यादरम्यान त्याची भेट शांताल कॉम्पानन हिच्याशी झाली. दोघेही प्रेमात पडले व त्यांनी लग्न केलं.
संबंधित बातम्या