(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharat Gaurav Deluxe Train: मिनी लायब्ररी, फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा; भारतीय रेल्वेकडून विशेष ट्रेन, जाणून घ्या काय आहे खास?
Bharat Gaurav Deluxe Train : भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय रेल्वेने 2021 मध्ये भारत गौरव योजना सुरु केली.
Bharat Gaurav Deluxe Train : गेल्या काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने देशातील विविध क्षेत्रांना जोडण्यासाठी नवीन मार्गांसह अनेक नवीन गाड्यांची घोषणा केली आहे. एवढंच नाही तर भारतीय रेल्वेने (Indian Railway) या गाड्यांमधील नावीन्य आणि नूतनीकरण या दोन्हींवर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी भारतीय रेल्वेने (IRCTC) भारत गौरव (Bharat Gaurav) डिलक्स पर्यटक ट्रेन सुरु केली, जी ईशान्य भारत (North East India) सर्किट पूर्ण करण्यासाठी नवी दिल्लीहून रवाना झाली. रेल्वे मंत्रालयाने या आलिशान ट्रेनमधील एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्याला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.
या राज्यांतील या स्थानकांवर ही ट्रेन जाणार
रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत माहितीनुसार, ही ट्रेन आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यात जाईल. ही ट्रेन 15 दिवसांत ईशान्य भारत सर्किटचा प्रवास करेल. ईशान्य भारत सर्किटची थीम "नॉर्थ ईस्ट डिस्कव्हरी: बियॉन्ड गुवाहाटी" अशी आहे. 21 मार्च 2023 रोजी दिल्ली सफदरजंग रेल्वे स्थानकावरुन सुरु झालेला हा रेल्वे प्रवास आसाममधील गुवाहाटी, शिवसागर, जोरहाट आणि काझीरंगा हा भाग कव्हर करेल. पुढे त्रिपुरातील उनाकोटी, आगरतळा आणि उदयपूर इथून ही ट्रेन जाईल. तर नागालँडमधील दिमापूर आणि कोहिमामार्गे मेघालयातील शिलाँग आणि चेरापुंजी इथे जाईल.
'नॉर्थ-ईस्ट डिस्कवरी' #BharatGaurav डीलक्स एसी टूरिस्ट ट्रेन मिनी लाइब्रेरी, फाइन डाइनिंग रेस्तरां जैसी अत्याधुनिक यात्री सुविधाओं से सुसज्जित है, जो यात्रियों को एक यादगार सफर का अनुभव कराएगी।#NorthEastDiscovery@AshwiniVaishnaw @MinOfCultureGoI @tourismgoi @MDoNER_India pic.twitter.com/JJi7omrfJw
— Ministry of Railways (@RailMinIndia) March 21, 2023
ही ट्रेन सुरु करण्यामागचा उद्देश काय?
भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय रेल्वेने 2021 मध्ये भारत गौरव योजना सुरु केली. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या "एक भारत श्रेष्ठ भारत" आणि "देखो अपना देश" या उपक्रमांतर्गत भारत गौरव पर्यटक ट्रेनचा शुभारंभ करण्यात आला आहे. दिल्ली, गाझियाबाद, अलीगढ, तुंडला, इटावा, कानपूर, लखनौ आणि वाराणसी इथून या ट्रेनमध्ये बोर्डिंग आणि डी-बोर्डिंगला परवानगी असेल. या डिलक्स एसी ट्रेनमध्ये एकूण 156 पर्यटक प्रवास करु शकतात. यात 1 एसी आणि 2 एसी कोचची व्यवस्था आहे.
ट्रेनमध्ये प्रवाशांना अनेक सुविधा मिळणार
15 दिवस धावणाऱ्या या ट्रेनचा गुवाहाटी हा पहिला थांबा असेल. इथे पर्यटक कामाख्या मंदिराला भेट देऊ शकतात. यानंतर तुम्ही उमानंद मंदिर आणि ब्रह्मपुत्रेवर सूर्यास्त क्रूझचा आनंद घेऊ शकाल. ही ट्रेन अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरपासून 30 किमी अंतरावर असलेल्या नाहरलागुन रेल्वे स्थानकापर्यंत देखील जाईल. या प्रवासात तुम्हाला अहोम राज्याची जुनी राजधानी शिवसागर देखील पाहायला मिळेल. रेल्वेच्या अधिकृत निवेदनात असं म्हटलं आहे की, आधुनिक डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेनमध्ये दोन उत्तम रेस्टॉरंट्सशिवाय मिनी लायब्ररीसारख्या अनेक सुविधा उपलब्ध असतील.
असे असेल भाडे
जर आपण या ट्रेनच्या भाड्याबद्दल बोललो तर ते एसी 2-टायरमध्ये प्रति व्यक्ती 1,06,990 रुपये, एसी-1 केबिनमध्ये प्रति व्यक्ती 1,31,990 रुपये आणि एसी-1 कूपमध्ये 1,49,290 रुपये प्रति व्यक्तीपासून सुरु होतं. तिकिटामध्ये रेल्वे प्रवास, हॉटेलमध्ये मुक्काम, सर्व शाकाहारी जेवण, संबंधित शहरांमध्ये प्रेक्षणीय स्थळे पाहणं आणि इतर खर्चाव्यतिरिक्त प्रवास विमा शुल्काचा समावेश आहे.