Vaccine Maitri Program : पुढील महिन्यापासून भारत पुन्हा इतर देशांना लसी पुरवणार, आरोग्यमंत्री मांडविया यांची माहिती
Vaccine Maitri Program : वॅक्सिन मैत्री अंतर्गत ऑक्टोबरपासून पुन्हा इतर देशांना कोरोना लसीचा पुरवठा सुरू केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली
नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून भारत पुन्हा इतर देशांना कोरोना लसीचे डोस पुरवण्यास सुरुवात करेल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी ही माहिती दिली आहे. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना भारताने 5 मे पासून कोरोनावरील लसींच्या निर्यातीवर बंदी घातली होती.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, वॅक्सिन मैत्री अंतर्गत ऑक्टोबरपासून पुन्हा पुरवठा सुरू केला जाईल. COVAX कार्यक्रमांतर्गत लसींचा पुरवठा करून भारत वसुधैव कुटुम्बकमचे ध्येय पूर्ण करेल . यामुळे जगाला कोरोनाविरोधात एकत्र लढण्यास मदत होईल.
मांडविया म्हणाले की , पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये देशाला लसीचे 30 कोटी डोस मिळतील. यासह , भारताकडे पुढील 90 दिवसांमध्ये 100 कोटी लसींचा साठा असेल . जर सर्व काही ठीक झाले , तर भारत ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये वॅक्सीन मैत्री अंतर्गत कोव्हॅक्स देशांना लस पुरवण्याच्या स्थितीत असेल.
केंद्रीय मंत्रालयाने सोमवारी सांगितले की,केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व स्त्रोताद्वारे 79.58 कोटींपेक्षा जास्त (79,58,74,395) लसींच्या मात्रा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पुरवल्या आहेत आणि 15 लाखापेक्षा जास्त मात्रा (15,51,940) पुरवठ्याच्या मार्गावर आहेत.याशिवाय लसीच्या 5.43 कोटी पेक्षा जास्त (5,43,43,490) शिल्लक असून अशा मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.
- कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 34 लाख 48 हजार 163
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 26 लाख 71 हजार 167
- सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 32 हजार 158
- एकूण मृत्यू : चार लाख 44 हजार 838
- देशातील एकूण लसीकरण : 80 कोटी 43 लाख 72 हजार 331 डोस
देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने मोठी भर पडत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 30 हजार 773 नव्या रुग्णांची भर पडली असून 309 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात देशामध्ये 38 हजार 945 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी शनिवारी रुग्णसंख्येत 35 हजार 662 इतकी भर पडली होती तर 281 लोकांचा मृत्यू झाला होता. काल नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी दोन तृतीयांश रुग्णसंख्या एकट्या केरळमध्ये सापडली आहे.