(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases Today : 24 तासांत देशात 11 हजार 451 नवे रुग्ण, 266 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today: मागील 24 तासांत देशात 11 हजार 451 नव्या कोरोना रुग्णाची भर पडली आहे. तर 266 जणांचा मृत्यू झालाय.
Coronavirus Cases Today : देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव अद्याप ओसरलेला नाही. काही ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. शनिवारच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत किंचितशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. शनिवारी देशात 10 हजार 853 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मात्र, यामध्ये रविवारी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 11 हजार 451 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 266 जणांचा मृत्यू झालाय. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची देशातील संख्या चार लाख 61 हजार 57 इतकी झाली आहे.
केरळनं देशाची चिंता वाढवली -
केरळ राज्यानं देशाची चिंता वाढवली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी जवळपास 60 टक्के रुग्ण एकट्या केरळ राज्यातील आहेत. मागील 24 तासांत केरळमध्ये सात हजार 124 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 21 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून केरळमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.
उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट -
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 13 हजार 204 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख 42 हजार 826 इतकी झाली आहे. मागील 262 दिवसांतील ही सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी 37 लाख 63 हजार 104 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 98.24 टक्के इतका झाला आहे. देशाचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 1.26 टक्के इतका झालाय. मागील 45 दिवसांपासून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्केंपेक्षा कमी आहे.
लसीकरण 108 कोटींच्या पार –
कोरोनावर मात करण्यासाठी देशात वेगानं लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. 24 तासांत देशभरात 25 लाखांपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे देशात 108 कोटी 47 लाख जणांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डोसची संख्या आहे.
India reports 11,451 new #COVID19 cases, 13,204 recoveries & 266 deaths in last 24 hours
— ANI (@ANI) November 8, 2021
Active caseload stands at 1,42,826 - lowest in 262 days. Recovery Rate currently at 98.24% - highest since March 2020. Active cases account for 0.42% of total cases - lowest since March 2020 pic.twitter.com/p8KcDHFzxb
राज्यातील स्थिती काय आहे?
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली असली तरी शनिवारच्या तुलनेत त्यात काहीशी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 892 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 16 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात राज्यातील 1,063 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 14,526 इतकी सक्रिय रुग्णसंख्या असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.6 टक्क्यांवर पोहोचले आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होत असून राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या 1,48,743 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 968 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 6,32,40, 769 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.