Pahalgam To Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ला ते भारताचं ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तानची नरमाई अन् शस्त्रसंधी, 18 दिवसांत काय घडलं?
Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला भारतानं त्याला ऑपरेशन सिंदूर द्वारे उत्तर दिलं.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडून शस्त्रसंधीवर सहमती दर्शवण्यात आली आहे. पाकिस्तानच्या डीजीएमओ यांनी भारताच्या डीजीएमओ यांना दुपारी 3.30 वाजता फोन करण्यात आला. यानंतर दोन्ही देशांकडून गोळीबार, जमीनीवरुन हल्ले, हवाई आणि सागरी कारवाया आज सायंकाळी 5.00 वाजल्यापासून थांबवण्यात आल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी दिली. डीजीएमओ 12 मे रोजी 12 वाजता पुन्हा चर्चा करतील असं मिसरी यांनी म्हटलं. मिसरी यांनी भारताची बाजू मांडण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याचं जाहीर केलं. पाकिस्तानचे विदेश मंत्री इशाक दार यांनी देखील पाकिस्तान शस्त्रसंधीस तयार असल्याचं जाहीर केलं. दोन्ही देशांमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून तणाव वाढला होता.
22 एप्रिल 2025, पहलगाम दहशतवादी हल्ला
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे बैसरण घाटीत चार दहशतवाद्यांनी पर्यटकांनावर गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात भारताचे 25 नागरिक आणि नेपाळचा एक नागरिक अशा एकूण 26 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 17 जण जखमी झाले होते.
24 एप्रिल 2025, नरेंद्र मोदींचा बिहारमधून इशारा
पहलगाम येथील हल्ला हा भारतामातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे, या हल्ल्याने देश शोकसागरात बुडाला आहे. पण, ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला, त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार, आता त्यांची शिल्लक राहिलेली जमिनही मातीत गाडण्याची वेळ आलीय, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
7 मे 2025, भारताचा एअर स्ट्राइक
भारतानं बुधवारी मध्यरात्री दीड वाजता पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर हल्ले केले. भारताच्या एअर स्पेसमधूनच हे हल्ले दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर करण्यात आले. यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतानं दिली. विंग कमांडर व्योमिका सिंग, कर्नल सोफिया कुरेशी आणि विदेश मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांच्याकडून पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली. भारतानं बहावलपूर, मुरीदके, सवाई, गुलपूर, बिलाल, कोटली, बरनाला, सरजाल,महमूना या ठिकाणी हल्ले केले.जैश-ए-मोहम्मद,लष्कर-ए-तोयबा,हिजबुल्लाच्या ठिकाणांवर भारतानं हल्ले केले. भारतानं या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं.
8 मे 2025 भारताच्या 15 लष्करी ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न पाकनं हाणून पाडला
‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भातील 07 मे 2025 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक असल्याचे म्हटले होते. यावेळी हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. तसेच, यापुढे भारतातील कोणत्याही लष्करी ठिकाणावर हल्ला केला गेला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल, हेही पुन्हा अधोरेखित करण्यात आले.
या इशा-यानंतरही 07-08 मे 2025 च्या रात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या ठिकाणी लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताकडून हे हल्ले ‘इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड’ व ‘एअर डिफेन्स सिस्टम’ने निष्फळ ठरवले. या हल्ल्यांचे पुरावे म्हणून विविध ठिकाणी आढळून आलेले अवशेष सध्या जमा करण्यात येत आहेत.
9 मे 2025 , 28 दहशतवाद्यांचा खात्मा
पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय सीमा रेषा आणि नियंत्रण रेषेवर 300 ते 400 ड्रोनचा वापर करण्यात आला. भारतानं यातील काही ड्रोन पाडले.मोठ्या प्रमाणावर हवाई घुसखोरीचा प्रयत्न, एअर डिफेन्स यंत्रणेची माहिती गोळा करणे, गोपनीय माहिती गोळी करणे हा त्यांचा उद्देश होता. भारतानं पाकिस्तानच्या चा ठिकाणांवर हल्ला केला. एका ठिकाणचं एडी रडार केंद्र उद्धवस्त करण्यात आलं. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीमुळं भारताचे काही जवान शहीद झाले तर काही नागरिकांना जीव गमवावा लागला.
9 मे 2025 रोजी भारतीय सीमा सुरक्षा दलाने (BSF) जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 7 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. आता या पाठोपाठ भारतीय सैन्याकडून 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
10 मे 2025, पाकिस्तानचा 26 शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न
गुजरात, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या ४ राज्यांमधील २६ शहरांवर ड्रोन हल्ले केले. श्रीनगर विमानतळावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. उत्तरेत जम्मूमधील बारामुल्ला ते पश्चिमेत गुजरातमध्ये भुज दरम्यान पाकिस्तानने 26 शहरांना लक्ष्य केलं. भारतीय वायूदलाने केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानमधील मुरीद चकवाल, शोरकोट, रहीम यार खान, चुनियां, नूर खान आणि सुक्कुर एअरबेस यांच्यावर हल्ले करून पाक लष्कराच्या महत्त्वाच्या रणनीतिक संसाधनांना धक्का दिला आहे.
10 मे 2025 अखेर शस्त्रसंधी
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडून शस्त्रसंधीवर सहमती दर्शवण्यात आली आहे. पाकिस्तानच्या डीजीएमओ यांनी भारताच्या डीजीएमओ यांना दुपारी 3.30 वाजता फोन करण्यात आला. यानंतर दोन्ही देशांकडून गोळीबार, जमीनीवरुन हल्ले, हवाई आणि सागरी कारवाया आज सायंकाळी 5.00 वाजल्यापासून थांबवण्यात आल्या. तर, डीजीएमओ यांची बैठक 12 मे रोजी 12 वाजता होणार आहे.























