नोटांवरही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असंच लिहिलंय, म्हणजे आता तिसरी नोटबंदी? आप खासदाराचं मोदी सरकारवर टीकास्त्र
India Or Bharat Issue: मोदी सरकारवर निशाणा साधत आप खासदार संजय सिंह म्हणाले की, AIIMS, ISRO आणि IIM हे सर्व भारतात आहेत. नोटेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असंही लिहिलेलं आहे.
Sanjay Sing on India Or Bharat Issue: G-20 डिनरच्या (G20 Guest Official Dinner Invitatio) निमंत्रण पत्रिकेवर 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख असल्यानं वादाला तोंड फुटलं आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुनच विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकास्र डागली जात आहेत. अशातच आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार आता तिसरी नोटबंदी करेल, कारण आपल्या चलनी नोटा आहेत त्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं लिहिलेलं आहे. त्यामुळे ते नोटांवरुनही इंडिया हटवतील आणि लोकांना पुन्हा नोटा बँकांमध्ये जमा करायला लावतील, असं संजय सिंह म्हणाले आहेत.
आप खासदार संजय सिंह म्हणाले की, "गेल्या अनेक दिवसांपासून एक वाद निर्माण केला जात आहे. भाजप (BJP) आणि मोदी सरकारला राज्यघटनेतून 'इंडिया' हा शब्द काढून टाकायचा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. याची सुरुवात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी केली होती. 'इंडिया' हा शब्द काढून टाकला पाहिजे, असं ते म्हणाले होते. त्यानंतर घटनेतूनच 'इंडिया' हा शब्द काढून टाकावा, अशा बातम्या मोदी सरकार प्रायोजित करत आहेत."
बाबासाहेबांचा एवढा द्वेष का करता : संजय सिंह
आप खासदार संजय सिंह पुढे बोलताना म्हणाले की, "मला त्यांना सांगायचं आहे की, ते बाबासाहेबांचा इतका तिरस्कार का करतात? आरएसएस आणि भाजपमध्ये अशी निराशा आहे की, त्यांच्याशी संबंधित कोणीही विचारवंत बनलं नाही. त्यांना काहीही लिहिता आलं नाही, त्यामुळेच बाबासाहेबांचं लिखाण कसं काढायचं असा विचार ते सातत्यानं करत असतात. राज्यघटनेच्या पहिल्या कलमात म्हटलं आहे की, "इंडिया दैड इज भारत विल बी यूनियन ऑफ स्टेस्ट."
IIM, AIIMS आणि ISRO या सर्व नावांमध्ये भारत : संजय सिंह
पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित आणि आदिवासींबद्दल द्वेष दाखवत असल्याचा आरोपही यावेळी बोलताना संजय सिंह यांनी केला. जोपर्यंत इंडिया आघाडीच्या युतीचा संबंध आहे, आम्ही लिहिले होते 'जुडेगा भारत, जीतेगा इंडिया'. त्यामुळे ते (मोदी सरकार) इंडिया हा शब्द काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. IIM, AIIMS आणि ISRO या सर्व संस्थांच्या नावांमध्येही इंडिया आहे. हा मोदी सरकारचा नापाक हेतू आहे. आम्ही याला विरोध करू आणि ज्यांची बाबासाहेबांवर श्रद्धा आहे ते हे नक्कीच खपवून घेणार नाहीत, असंही ते म्हणाले.