(Source: ECI/ABP News/ABP Majha)
G20 Summit : भारतातील परिषदेला चीनचे अध्यक्ष गैरहजर, भारत-चीन संबंधावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग G20 शिखर परिषदेत सहभागी होणार नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. शी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीमुळे भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये भविष्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.
G20 Summit India: भारतात होणाऱ्या G20 शिखर परिषदेमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्याऐवजी कमी महत्त्वाच्या म्हणजे राज्य परिषदेच्या पंतप्रधानांना भारतात पाठवण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात भारत आणि चीनच्या संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
शिखर परिषदेला अवघे चार दिवस उरले असताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान ली कियांग नवी दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहतील. ली कियांग भारतातील नवी दिल्ली G20 शिखर परिषदेसाठी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. भारत सरकारच्या निमंत्रणावरून राज्य परिषदेचे पंतप्रधान ली कियांग नवी दिल्ली येथे होणाऱ्या 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान 18 व्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहतील.
शी जिनपिंग भारतातील जी 20 परिषदेला का येणार नाहीत याचे कारण मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं नाही. 2013 साली सत्तेत आल्यापासून शी जिनपिंग हे पहिल्यांदाच G20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत.
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे 22-24 ऑगस्ट रोजी झालेल्या ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या ब्रिक्स शिखर परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित राहतात. परंतु ते भारतात येण्याचं टाळतात हे विशेष.
G20 हा आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचा एक महत्त्वाचा मंच आहे. चीनने G20 कार्यक्रमांना खूप महत्त्व दिले आहे आणि त्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. या वर्षीच्या G20 शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान ली कियांग G20 सहकार्याबाबत चीनची मते आणि धोरणे समोर ठेवतील. G20 देशांमध्ये अधिक एकता, सहकार्य साधण्याचा प्रयत्न करतील. तसेच ते जागतिक आव्हानांना कसं सामोरं जायचं यावर चर्चा करतील.
G20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद दरवर्षी एका देशाकडे जातं. त्यावेळी अध्यक्षीय देशाने इतर देशांची समन्वय साधून जागतिक अर्थव्यवस्थेसंबंधित आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींबद्दल अजेंडा तयार करणे अपेक्षित असतं. G20 परिषदेमध्ये सातत्य सुनिश्चित करण्यासाठी या आधीच्या अध्यक्षीय देशाने, सध्याच्या अध्यक्षीय देशाने आणि पुढच्या वर्षीच्या अध्यक्षीय देशाने काही योजना बनवणे अपेक्षित असते. या तीन देशांच्या गटाला ट्राईका असं म्हटलं जातं. यंदा इंडोनेशिया, भारत आणि ब्राझिल हे ट्राईका ग्रुपचे सदस्य आहेत.
2008 सालच्या जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आणि 2009 मध्ये जग जेव्हा आर्थिक संकटाला तोंड देत होते त्यावेळी G20 गटाने योग्य ते निर्णय घेऊन आपापल्या अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांना बऱ्यापैकी यश आहे. त्यामुळे G20 गटाचं महत्वही अधोरेखित झालं. तेव्हापासून G20 गटाचे देश एकमेकांच्या संपर्कात राहतात आणि हे बहुपक्षीय मंच आंतरराष्ट्रीय सहकार्याचं प्रमुख व्यासपीठ बनलं आहे.
ही बातमी वाचा: