(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona | सलग तिसऱ्या दिवशी देशात 16 हजारापेक्षा जास्त रुग्ण, आतापर्यंत दीड कोटी लोकांचं लसीकरण
Coronavirus Updates: देशात कोरोनाचा मृत्यू दर 1.42 टक्के इतका आहे तर रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या 16 हजाराहून जास्त रुग्णांची भर पडली आहे.
नवी दिल्ली: देशातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याचं दिसत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येने 16 हजारांचा टप्पा ओलांडल्याचं दिसून आलंय. 24 तासात 16,488 कोरोनाच्या नवे रुग्णांची भर पडली असून त्यामुळे 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 12,771 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ही एक कोटी 10 लाख 79 हजार 979 इतकी झाली आहे. त्यामध्ये एकूण 56 हजार 938 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एक कोटी सात लाख 63 हजार 451 लोक कोरोनाच्या धोक्यातून बरे झाले असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता एक लाख 59 हजार 590 इतकी आहे.
महाराष्ट्र राज्यात सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांहून जास्त रुग्णांची भर पडली आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतोय.
देशातल्या कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असून आतापर्यंत जवळपास दीड कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झालं आहे. आतापर्यंत एक कोटी 42 लाख 42 हजार 547 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. येत्या एक मार्चपासून 60 वर्षावरील लोकांना तसेच 45 वर्षावरील आजारी लोकांना लस देण्यात येणार असल्याचं सरकारने जाहीर केलंय. आयसीएमआरच्या अहवालानुसार, 26 फेब्रुवारीपर्यंत कोरोना व्हायरसच्या एकूण 21 कोटी 54 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अॅक्टिव्ह केसच्या बाबतीत भारत आता जगात 13 व्या क्रमांकावर आला आहे. एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येतही अमेरिकेनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येत अमेरिका, ब्राझिल आणि मेक्सिकोनंतर भारताचा चौथा क्रमांक लागतो.