India Corona Case Today : देशात सलग चौथ्या दिवशी 3 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद; 24 तासांत 2767 रुग्णांचा मृत्यू
India Corona Case Today : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच गेल्या चार दिवसांत देशात 1.3 मिलियन हून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली होती. 21 एप्रिलपासून 24 एप्रिलपर्यंत क्रमश: 3.14 लाख, 3.32 लाख, 3.46 लाख, 3.49 लाख रुग्णांची नोंद झाली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 349,691 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 2767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 2,17,113 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी शुक्रवारी देशात 346,786 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.
दरम्यान, चार दिवसांत देशात 1.3 मिलियन हून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली होती. 21 एप्रिलपासून 24 एप्रिलपर्यंत क्रमश: 3.14 लाख, 3.32 लाख, 3.46 लाख, 3.49 लाख रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा जगभरातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
देशातील आजची कोरोना स्थिती :
- एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 69 लाख 60 हजार 172
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 40 लाख 85 हजार 110
- एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 26 लाख 82 हजार 751
- कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 92 हजार 311
- देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 14 कोटी 9 लाख 16 हजार 417 डोस
महाराष्ट्रात शनिवारी 67,167 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, तर 63,118 रुग्णांची कोरोनावर मात
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. काल 67 हजार 160 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर काल 63 हजार 818 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 34 लाख 68 हजार 610 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.02 टक्के झाले आहे. राज्यात काल 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के आहे.
मुंबई गेल्या 24 तासात 5867 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 5867 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 29 हजार 817 वर पोहोचली आहे. सध्या 78 हजार 226 एकूण सक्रिय रुग्ण आहेत.
सीरम पाठोपाठ भारत बायोटेककडूनही कोरोना लसीच्या किमती जाहीर
भारत बायोटेकने संपूर्ण स्वदेशी लस COVAXIN लसीच्या प्रति डोसच्या किमतीची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं की, राज्य सरकारसाठी प्रति डोस 600 रुपये आणि खाजगी रुग्णालयांसाठी 1,200 रुपये प्रति डोस दराने देण्यात येणार आहे. भारत बायोटेकने सांगितलं की, केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार, आम्ही कोवॅक्सिन लसीच्या डोसच्या किमतींची घोषणा केली आहे. यापूर्वी बुधवारी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने सांगितलं होतं की, "कोविड-19 लस 'कोविशील्ड' ची किंमत राज्य सरकारसाठी 400 रुपये प्रति डोस आणि खासजी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- देशातील ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी वायुदलसह नौदलाचा पुढाकार; सिंगापूरहून प्राणवायू घेऊन परतली IAF ची विमानं
- Covaxin Vaccine Prices : सीरम पाठोपाठ भारत बायोटेककडूनही कोरोना लसीच्या किमती जाहीर; काय असतील दर?
- COVISHIELD Prices Controversy : 'उत्पादन वाढवण्यासाठी गुंतवणुकीची गरज', कोविशिल्डच्या किंमतीवरील चर्चेवर सीरमचं स्पष्टीकरण