(Source: ECI/ABP News/ABP Majha)
I.N.D.I.A. Alliance : दिल्लीत विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीची चौथी बैठक; जागा वाटपाबाबत काँग्रेसचा 'हा' प्लान?
INDIA Alliance : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर ही बैठक होणार आहे. त्यामुळे निकालाचे पडसाद ही उमटण्याची शक्यता आहे.
I.N.D.I.A. Alliance Meeting : जवळपास साडे तीन महिन्यानंतर विरोधकांच्या इंडिया आघाडीची (I.N.D.I.A. Alliance Meeting) बैठक मंगळवारी 19 डिसेंबर रोजी दिल्लीत पार पडत आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024) जागा वाटप आणि संयुक्त जाहिरनामा या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर ही बैठक होणार आहे. त्यामुळे निकालाचे पडसाद ही उमटण्याची शक्यता आहे.
बैठकीत कोण होणार सहभागी?
विधानसभा निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीची बैठक पार पडणार होती. मात्र, तामिळनाडूमध्ये आलेले चक्रीवादळ आणि इतर घटक पक्षाच्या नेत्यांनी दाखवलेली अनुपलब्धता यामुळे बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
इंडिया आघाडीतील बैठकीत 27 पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. काँग्रेसकडून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी सहभागी होणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला, पीडीपीकडून मेहबूबा मुफ्ती, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि आरएलडीचे जयंत चौधरी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
त्याशिवाय अपना दलाकडून (कमेरावादी) कृष्णा पटेल, जेडीयूकडून नितीश कुमार आणि आरजेडीकडून लालन सिंग, लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव, सीपीआयएमएलकडून दीपंकर भट्टाचार्य, सीपीएमकडून सीताराम येचुरी, सीपीआयकडून डी. राजा, तृणमूल काँग्रेसकडून ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार हे नेते शिवसेनेचे उद्धव ठाकरे, द्रमुक पक्षाचे एमके स्टॅलिन, मुस्लिम लीगचे कादर मोहिद्दीन आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन उपस्थित राहणार आहेत.
त्याशिवाय, केरळ काँग्रेसचे जोश के मणी, आरएसपीचे एनके प्रेमचंद्रन आणि व्हीसीकेचे थिरुमावलावन, एमडीएमकेचे वायको, केरळ काँग्रेसचे पीसी थॉमस जोसेफ, फॉरवर्ड ब्लॉकचे जी देवराजन, एमएमकेचे मोहम्मद जवाहिरुल्ला, ई.आर. शेकापचे जयंत पाटील आदी नेते दिल्लीतील बैठकी उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणूक एकजुटीने लढण्याचा निर्धार
इंडिया आघाडीची बैठक ऑगस्ट महिन्यात पार पडली होती. या बैठकीत आघाडीतील पक्षांनी एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. शक्य होईल त्या ठिकाणी भाजपविरोधात संयुक्त उमेदवार देण्यात येणार आहे. आघाडीने काही समित्यांचीही स्थापना केली आहे.
मित्रपक्षांना जागा सोडण्यासाठी काँग्रेसवर दबाव
विधानसभा निवडणूक निकालानंतर आघाडीतील मित्रपक्षांकडून आता काँग्रेसकडे अधिक जागांची मागणी होण्याची शक्यता आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार, काँग्रेस सुमारे 310 जागांवर निवडणूक लढवू शकते आणि मित्र पक्षांसाठी सुमारे 230 जागा सोडू शकते.
काँग्रेस कोणत्या राज्यात किती जागांवर निवडणूक लढवू शकते?
काँग्रेसने मित्रपक्षांसाठी अधिक जागा सोडण्याचा निर्णय घेताना काही मोजक्या जागांवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतल्यास राज्यनिहाय पुढीलप्रमाणे जागा वाटप असू शकते.
जम्मू-काश्मीर - 2
लडाख - 1
पंजाब - 6
चंदीगड -1
हिमाचल प्रदेश - 4
हरियाणा - 10
दिल्ली - 3
राजस्थान - 25
गुजरात - 26
मध्य प्रदेश - 29
छत्तीसगड - 11
उत्तर प्रदेश - 15 ते 20
उत्तराखंड - 5
बिहार - 6 ते 8
झारखंड - 7
ओडिशा - 21
पश्चिम बंगाल - 6 ते 10
आंध्र प्रदेश - 25
तेलंगणा - 17
कर्नाटक - 28
महाराष्ट्र - 16 ते 20
तामिळनाडू - 8
केरळ - 16
ईशान्य भारतात 25 जागा आणि गोव्यात दोन जागांवर काँग्रेस निवडणूक लढवू शकते.