Ajit Pawar: मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
Maharashtra assembly Election Result 2024: मावळमध्ये सुनील शेळके यांना विजयाची खात्री नव्हती. मात्र, त्यांनी एक लाख मतांनी विजय मिळवला.
पुणे: पुण्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरलेल्या मावळ मतदारसंघात अजित पवार गटाच्या सुनील शेळके यांनी बाजी मारली. या मतदारसंघातून सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपने प्रचंड विरोध केला होता. मावळमध्ये यंदा सुनील शेळके (Sunil Shelke) यांना पाडण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आले होते. राज्यात या मावळ पॅटर्नची (Maval Pattern) चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, सुनील शेळके या सर्व विरोधकांचे आव्हान मोडीत काढत विजयी होऊ दाखवले. सुनील शेळके मावळमधून थोड्याथोडक्या नव्हे तर एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन निवडून आले आहेत. यानंतर सुनील शेळके यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. त्यावेळी अजित पवार यांनी सुनील शेळके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा एक किस्सा उपस्थितांना सांगितला.
अजित पवार यांनी सांगितले की, याची तर ओळख मी डायरेक्ट... आमच्यावेळी मोदींच्या सभेवेळी हा बाहेर थांबला. आमच्या इथे सगळे आमदार आत, शेवटी याला कोणी आतच घेईना. शेवटी मोदीसाहेब शेजारी बसल्यावर सांगितलं, माझा एक आमदार बाहेर थांबलाय, त्याला ताबडतोब आत घ्यायचा आहे. त्यांनी मागच्या सिक्युरिटीला सांगितलं, अजित पवार कोणाला बोलतात, त्याला आत घ्या. मग आत घेऊन सुनील शेळकेंची सेप्रेट ओळख करुन दिली, तोच फोटो त्याने सगळीकडे चालवला. कारण भाजप टोटली विरोधात. सुनील मला आधी म्हणायचा माझी सीट गेली. पण मतदानाच्या दिवशी म्हणाला माझी सीट एक लाखांनी निवडून येणार. माझ्यापेक्षा जास्त मताधिक्याने सुनील शेळके निवडून आला, असे अजित पवार यांनी म्हटले
जयंत पाटील विजयाचं सर्टिफिकेट घ्यायलाही आले नाहीत, अमोल मिटकरींचा टोला
जयंत पाटील साहेब यांच्याबाबत मला वाईट वाटते. ते विजयाचं प्रमाणपत्र घ्यायलाही गेले नाहीत. जयंत पाटलांनी आनंदोत्सवही साजरा केला नाही, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीविरोधात निवडणूक लढताना रोहित पवारांनी त्यांची लायकी काढली. ते कर्जत जामखेडच्या मतदारांनी नाकारलं. बारामती अॅग्रोचा पैसा आणि काही पेड गुंड राम शिंदेंच्या विजयाआड आले. पण भाजप राम शिंदे यांना योग्य पद्धतीने बळ देईल आणि योग्यवेळी ते आपल्या पराभवाचा वचपा काढतील, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.
आणखी वाचा
'मावळ पॅटर्न’ फसला; सुनील शेळकेंची जादू चालली, मोठ्या मताधिक्यांनी मिळवला विजय