Russia Ukraine War: रशियाविरोधात UN मध्ये 141 देश एकवटले; नेपाळनेही विरोधाची भूमिका घेतली, पण भारत तटस्थ
Russia Ukraine War: संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बैठकीत रशियाच्या विरोधात 141 देशांनी मतदान केलं तर भारताने मतदानासाठी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलं.
नवी दिल्ली: रशियाने युक्रेनमधून आपलं सैन्य माघार घ्यावं अशा आशयाचा ठराव संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पारित करण्यात आला. यावेळी 141 देशांनी रशियाच्या विरोधात भूमिका घेत मतदान केलं तर 5 देशांनी रशियाच्या बाजूने मतदान केलं. विशेष म्हणजे नेपाळने रशियाच्या विरोधात भूमिका घेतली तर भारताने सलग तिसऱ्यांदा तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
एकूण 35 देशांनी या ठरावावर तटस्थ भूमिका घेतली. यामध्ये भारताचा समावेश आहे. रशिया-युक्रेन युद्धावर भारताने सलग तिसऱ्या ठरावावर तटस्थपणाची भूमिका घेतली आहे. भारतासोबत पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश या देशांनीही तटस्थता दाखवली आहे.
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत एखादा ठराव पारित होण्याकरता दोन तृतियांश मतदानाची गरज असते.
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या आजच्या बैठकीत रशियाच्या आक्रमणाचा निषेध करण्यात आला आहे. रशियाने तातडीने सैन्य माघार घ्यावी आणि शांतता प्रस्थापित करावी असा ठराव मांडण्यात आला. युरोपियन युनियनच्या सर्व देशांनी रशियाच्या विरोधात मतदान केलं आहे.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी झालेल्या आमसभेच्या 15 देशांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीतही भारताने रशियाविरोधातल्या ठरावावर तटस्थपणा दाखवला होता. त्यावेळी 11 देशांनी रशियाविरोधात मतदान केलं होतं.
भारतीयांनी खासकिव्ह सोडावं, परराष्ट्र मंत्रालयाचं आवाहन
दरम्यान, खारकिव्ह शहरात भीषण हल्ले वाढवले आहेत. त्यामुळं भारतीयांनी तातडीनं खारकिव्ह शहर सोडावं असे आदेश परराष्ट्र मंत्रालयानं दिले आहेत. मात्र खारकिव्हमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. ट्रेनमध्येही भारतीयांना प्रवेश मिळत नाही, अशी माहिती तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी दिली आहे. गोळीबाराचे आणि बॉम्बस्फोटाचे भीषण आवाज विद्यार्थ्यांच्या कानी पडत आहेत, असे देखील ते म्हणाले.
आज सकाळी सहा वाजता मुलांनी विद्यापीठ सोडलंय. बारा किलोमीटर पायी चालत ही मुलं कशीबशी रेल्वे स्टेशन वर पोहोचली आहेत. सुमारे दोन हजार मुलं सकाळपासून रेल्वे स्टेशन वरतीच उभा आहेत. त्यांना युक्रेनियन नागरिक ट्रेनमध्ये चढू देत नाहीत. युक्रेनच्या खारकिव्ह शहरात असलेल्या भारतीयांनी एबीपी माझाला ही भीषण परिस्थिती सांगितली आहे. सध्या ते रेल्वे स्टेशनच्या खाली आश्रय घेऊन बसलेले आहेत. त्या ठिकाणी प्रचंड स्फोटांचे आवाज येत आहेत आणि गोळीबारही सुरू आहे.
संबंधित बातम्या :