Bihar Election: जर भाजपने अवलंबला '1995 चा महाराष्ट्र फॉर्म्युला' तर नितीश कुमारांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात
महाराष्ट्र राज्याच्या 1995 सालच्या निवडणुकीत कमी जागा मिळाल्याने भाजपला मुख्यमंत्री पदावरचा हक्क सोडावा लागला होता आणि शिवसेनेला मोठा भाऊ मानून मुख्यमंत्रीपद द्यावं लागलं होतं. हाच फॉर्म्युला बिहारमध्ये अवलंबवायचा ठरवला तर नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदावरचा हक्क सोडावा लागेल.
पाटणा: बिहार निवडणुकीतील आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार बिहारमध्ये एनडीएची सत्ता येण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या उलट आलेल्या निकालाने कालपर्यंत काहीशा नाराज असलेल्या एनडीएच्या गोटात आता मात्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निकालात भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर आहेत. सध्याच्या कलानुसार असेच दिसते की भाजप हाच बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. कुणाच्याही जागा जास्त असो वा कमी, नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री बनतील अशा प्रकारचे वक्तव्य या आधी भाजपकडून सातत्याने करण्यात आले होते. आता प्रश्न असा आहे की भाजप त्याच्या या वक्तव्यावर ठाम राहतो का? का भाजप आपला मुख्यमंत्री बनवण्यासाठी 1995 सालचा महाराष्ट्र फॉर्म्युला अवलंबणार?
काय आहे महाराष्ट्र फॉर्म्युला? महाराष्ट्र राज्याच्या 1995 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती. युतीला बहुमत मिळाल्यानंतर भाजपला शिवसेनेपेक्षा कमी जागा मिळाल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडावा लागला होता. त्यावेळी महाराष्ट्रात भाजपचे मुख्य़मंत्रीपदाचे त्यांचे स्वप्न भंगले होते. सर्वाधिक जागा शिवसेना पक्षाला मिळाल्याने त्याला राज्यात मोठा भाऊ मानून मुख्यमंत्री पद द्यावं लागलं होतं आणि उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यावेळी शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले होते.
1990 सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 183 जागा लढवल्या होत्या आणि 52 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपने 105 जागा लढवल्या आणि त्यातल्या 42 जागा जिंकल्या होत्या. 1995 साली जागा वाटपाचा हाच फॉर्म्युला अवलंबण्यात आला होता. त्यावेळी शिवसेनेला 73 जागा तर भाजपला 65 जागांवर विजय मिळाला होता.
बिहार निवडणुकीत एनडीएचे घटक पक्ष जेडीयूने 115 जागा तर भाजपने 110 जागा लढवल्या होत्या. बाकी जागा इतर घटक पक्षांनी लढवल्या. महागठबंधनमध्ये राजदने 144 उमेदवार उभे केले होते तर कॉंग्रेसने 70 उमेदवार उभे केले होते.
सध्याची परिस्थिती बघता संयुक्त जनता दलापेक्षा भाजपच्या जवळपास 30 जागा जास्त येतील अशी शक्यता आहे. तसेच एनडीएला हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्मामुळे मिळाला आहे अशी सर्वत्र हवा केली जात आहे.
अजून जरी बिहारमध्ये नितीश कुमार हेच मुख्य़मंत्री बनतील असे चित्र निर्माण केले जात असले तरी पडद्यामागे काही वेगळेच चालू असल्याची चर्चा आहे. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री अशी 1995 च्या अगदी सरळ सोपा फॉर्म्युला अमलात आणायचे ठरले तर सत्तेचे चित्र बदलू शकते. अशा वेळी भाजप आपल्या नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देण्याच्या शब्दावर कायम राहतो का ते पाहणे उत्सुक्याचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या:
Bihar Election Results : कसं आणि कुठे पाहू शकाल बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल?
तेजस्वीनं सर्वांना फेस आणला, ते आज मॅन ऑफ द मॅच ठरलेत : संजय राऊत