... तर घरात घुसून मारु, नरेंद्र मोदींचा पाकिस्तानसह दहशतवाद्यांना इशारा
मताच्या राजकारणात बुडलेल्या लोकांना कडक पाऊल उचलण्यात भीती वाटत होती. मात्र मला सत्तेची चिंता नाही. मला माझ्या देशाची काळजी आहे. मला माझ्या देशातील नागरिकांच्या सुरक्षेची काळजी आहे, असं नरेंद्र मोदींनी भाषणात म्हटलं.
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानसह, दहशतवाद्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतरही वठणीवर न येणाऱ्या पाकिस्तानला, घरात घुसून मारु अशा स्पष्ट शब्दात नरेंद्र मोदींनी इशारा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानसोबत विरोधकांनाही धारेवर धरलं. विरोधी पक्षातील काही नेत्यांची विधाने पाकिस्तानातील वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स बनत आहेत, असंही मोदी यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका सभेत बोलत होते.
मी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही. एकेका शत्रूचा शोधून शोधून बदला घेणं माझा स्वभाव आहे. त्यामुळे त्याता घरात घुसून मारू, असा अल्टिमेटम नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला दिला आहे. गेल्या 40 वर्षांपासून पाकिस्तान भारतावर हल्ले करत आहे. मात्र आता दहशतवादाला सहन केले जाणार नाही.
मताच्या राजकारणात बुडलेल्या राजकारण्यांना कडक पाऊल उचलण्याची भीती वाटत होती. मात्र मला सत्तेची चिंता नाही. मला माझ्या देशाची काळजी आहे. मला माझ्या देशातील नागरिकांच्या सुरक्षेची काळजी आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.
पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकवर बोलताना मोदी म्हणाले की, एक काम पूर्ण झाल्यावर आमचं सरकार झोपा काढत नाही. आम्ही लगेचच दुसऱ्या कामाच्या तयारीला लागतो. मोठे आणि कठीण निर्णय घेण्यास आम्ही मागे पुढे पाहत नाही.