(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Double Mask : कोरोना काळात डबल मास्क वापरणे किती फायदेशीर?
डबल मास्क वापरल्याने कोरोना व्हायरसचा फैलाव 95 टक्के रोखला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी डबल मास्क घातला तर स्थितीत मोठ्या प्रमाणावर सुधार होईल, असं निरीक्षण CDC ने केलं आहे.
नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाची आकडेवारी रोज नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील रोजच्या कोरोनाबाधितांची आकडेवारी चार लाखांच्या पुढे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने चिंतेचं वातावरण आहे. देशातील अनेक राज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कडक केले आहेत, तर काही राज्यांनी लॉकडाऊन लागू केले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यात सोशल मीडियावर डबल मास्कबाबत काही पोस्ट व्हायरल होत आहेत. नेमकं डबल मास्कबाबत सत्य काय आहे, हे जाणून घेऊया.
अमेरिकेत डबल मास्कबाबत निरीक्षण
अमेरिकेत काही दिवसांपूर्वी डबल मास्कबाबत परीक्षण करण्यात आलं. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेन्शन (CDC) ने याबाबत परीक्षण केलं, यामध्ये अशी माहिती मिळाली की डबल मास्क वापरल्याने कोरोना व्हायरसचा फैलाव 95 टक्के रोखला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी डबल मास्क घातला तर स्थितीत मोठ्या प्रमाणावर सुधार होईल. याच परीक्षणाच्या आधारे काही दिवसांपासून अनेक आरोग्य तज्ज्ञ लोकांना डबल मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत.
डबल मास्क कसा वापरायचा?
- दोन सर्जिकल मास्क असल्यास ते अशा पद्धतीने लावा की तोंड आणि नाक नीट झाकले जाईल. मात्र दोन सर्जिकल मास्क लावण्याचा सल्ला सहसा दिला जात नाही.
- एक कापडी मास्क आणि एक सर्जिकल मास्क असल्यास प्रथम सर्जिकल मास्क लावावा आणि त्यावर कापडी मास्क लावावा.
- जर N-95 मास्कचा वापर करत असाल तर तुम्हाला डबल मास्कची गरज लागणार नाही. कारण कोरोना विषाणूंपासून संरक्षणासाठी N-95 मास्क चांगल्या दर्जाचा आहे.
या गोष्टी लक्षात ठेवा
- सर्जिकल मास्कचा वापर केवळ एकदा केला जाऊ शकतो.
- सर्जिकल मास्क वापरल्यानंतर त्याची व्यवस्थितरित्या विल्हेवाट करावी.
- तसेच कापडी मास्क वापरत असाल तर तो मास्क रोज गरम पाण्यात धुवा.
- मास्क काढत असता बोलणे टाळा. मास्क काढल्यानंतर हात सॅनिटाईज करा.
संबंधित बातम्या