Omicron Test Symptoms : ओमायक्रॉन कसा ओळखायचा?, भारतीय संशोधकांनी लढवली भन्नाट युक्ती
S gene Dropout Or S Gene Target Failure : जीनोम सिक्वेन्सिंग न करताच बाधित व्यक्ती ओमायक्रोन संक्रमित आहे का? हे चाचणीमधून स्पष्ट होत आहे. अवघ्या 259 रुपयांत ओमायक्रॉनचे लवकर निदान करणे शक्य होत आहे.
S gene Dropout Or S Gene Target Failure : ओमायक्रॉन या नव्या कोरोना व्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातलाय. दररोज या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरियंट शोधण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करावं लागतेय, त्यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. तसेच जीनोम सिक्वेन्सिंगच्या रिपोर्टला उशीर लागत असल्यामुळेही आरोग्य विभागासमोरील अडचणी वाढल्या आहेत. अशातच भारतीय संशोधकांनी ओमायक्रॉनच्या लवकर निदानासाठी भन्नाट युक्ती अंमलात आणली आहे. "एस जीन टार्गेट फेल्युअर" (S gene Dropout Or S Gene Target Failure) असे त्याचे नाव आहे. आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या एका खास किटच्या मदतीने जीनोम सिक्वेन्सिंग न करताच बाधित व्यक्ती ओमायक्रोन संक्रमित आहे का? हे चाचणीमधून स्पष्ट होत आहे.
सध्या प्रशासनासमोर वाढत्या कोरोना बाधितांसह ते कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रोन ने संक्रमित तर नाही ना? हे शोधण्याचेही मोठे आव्हान आहे. मात्र, त्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग हे आवश्यक असल्याने ओमायक्रोनचं निदान होण्यामध्येच अनेक दिवसांचा कालावधी जात आहे. शिवाय ती प्रक्रिया प्रचंड खर्चिक ही आहे. मात्र, आता भारतीय संशोधकांनी एक नवी युक्ती अंमलात आणली आहे. "एस जीन टार्गेट फेल्युअर" असे त्याचे नाव असून आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या एका खास किटच्या मदतीने जीनोम सिक्वेन्सिंग न करताच बाधित व्यक्ती ओमायक्रोन संक्रमित आहे का हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे भारत सरकारच्या आरोग्य विभागाने ओमायक्रोनच्या तीव्र संक्रमणासोबत लढण्यासाठी "एस जीन टार्गेट फेल्युअर" तंत्राचा अवलंब करण्याचा सल्ला राज्यांना दिला आहे.
अत्यंत सूक्ष्म आकाराचा कोरोना विषाणू तीव्रतेने स्वतःमध्ये बदल करत आहे. संशोधक त्याला म्युटेशन म्हणतात. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोन ही म्युलेटशनचाच प्रकार असून त्याने आधीच्या डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत स्पाईक प्रोटीन मध्ये बदल केला आहे. ओमायक्रोन व्हेरियंटचे हे बदल साध्या आणि प्रचलित असलेल्या आरटीपीसीआर चाचणीतून लक्षात येत नाहीत. त्यामुळे व्यक्ती ओमायक्रोन व्हेरियंटने संक्रमित आहे का हे शोधण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करण्याचा सल्ला दिला जात होता. मात्र, जीनोम सिक्वेन्सिंगला बराच वेळ लागतो, ती खर्चिक ही आहे ( एक जीनोम सिक्वेन्सिंगसाठी किमान ५ हजारांचा खर्च येतो )... तसेच भारतातील मोजक्याच प्रयोगशाळेत ती होत असल्याने भारतात कोरोना बाधित व्यक्ती ओमायक्रोन व्हेरियंटने संक्रमित आहे की नाही याचे तीव्रतेने निदान होण्यावर मर्यादा येत होत्या... मात्र, आता आरटीपीसीआर चाचणीसाठीच्या एका परकीय कीट द्वारे ओमायक्रोनचा निदान होण्यास मदत होत आहे. टेक पॅथ आरटीपीसीआर किटमध्ये "एस जीन टार्गेट फेल्युअर" येतो. म्हणजेच कोरोना विषाणूचा "एस जीन" डिटेक्ट होत नाही. तर "एन जीन" आणि "ओआरएफ जीन" दिसून येतात. संशोधकांच्या मते ही अवस्था ओमायक्रॉनच्या संक्रमणाकडे संकेत करणारी असते...
भारतात आतापर्यंत ओमायक्रोनचं निदान होण्यासाठी ज्या जीनोम सिक्वेन्सिंगचे आधार घेतला जात आहे... ती चाचणी मोजक्याच प्रयोगशाळेत होते. त्यामुळे येणाऱ्या दिवसात भारतात ओमायक्रोनचे संकट मोठे झाल्यावर प्रत्येक कोरोना बाधितासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करणे कठीण होणार आहे. शिवाय प्रत्येक रुग्णाच्या जीनोम सिक्वेन्सिंगसाठी लागणार पाच हजारांचा खर्च ही सरकारला परवडणारा नाही. त्यामुळे भारत सरकारच्या आरोग्य विभागाने ही ओमायक्रॉनच्या लवकर निदानासाठी डबल आरटीपीसीआर चाचणीचा अवलंब करण्याचा सल्ला राज्यांना दिला आहे. त्या अंतर्गत सुमारे 19 रुपयांच्या भारतीय आरटीपीसीआर किट वर पहिल्यांदा कोरोना चाचणी करून ती व्यक्ती कोरोना बाधित आहे की नाही याचे निदान करणे अपेक्षित आहे. आणि त्या चाचणीत जे व्यक्ती कोरोना बाधित आढळतील.. त्यांची दुसरी चाचणी 240 रुपयांच्या परकीय टेक पॅथ आरटीपीसीआर कीट वर करणे अपेक्षित आहे. त्यात "एस जीन टार्गेट फेल्युअर" आल्यास ती व्यक्ती ओमायक्रोन व्हेरियंटने बाधित असल्याचे समजावे, असे केंद्रीय आरोग्य विभागाने सुचविले आहे. म्हणजेच डबल आरटीपीसीआर चाचणीच्या तंत्राचा अवलंब केल्याने अवघ्या 259 रुपयांत ओमायक्रॉनचे लवकर निदान करणे शक्य होत आहे. भारतासारख्या अधिक लोकसंख्येच्या देशात तसेच जीनोम सिक्वेन्सिंगसाठी मर्यादित पायाभूत सोयी असलेल्या देशात डबल आरटीपीसीआर चाचणीचे हे तंत्र फायद्याचे असल्याचे तज्ज्ञांना वाटतंय...
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांची संख्या जास्त आहे.. तिथे डबल आरटीपीसीआर चाचणीचे तंत्र अंमलात आणले आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या चाचणीत ज्या रुग्णांबद्दल "एस जीन टार्गेट फेल्युअर" येत आहे, त्यांचेच नमुने पुढे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविले जात आहेत. त्यामुळे वेळेची बचत होऊन ओमायक्रॉनचे लवकर निदान होण्यास मदत होणार आहे. शिवाय संसाधनांची मोठी बचत होऊन कोरोना विरोधातला लढा नियोजनबद्ध काण्यास मदत होणार आहे.