राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय, रुग्णालयात दाखल होणाऱ्याची संख्या दुप्पट, मृत्यूही वाढले
Corona Case Increase in Delhi : राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे.
Corona Case Increase in Delhi : राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ पाहायला मिळत आहे. मास्क सक्ती केल्यानंतरही राजधानी दिल्लीमध्ये वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांतील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या पाहाता रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. ही बाब चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना गंभीर आजारांने ग्रासलं असल्याचेही समोर आले आहे.
राजधानी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असणाऱ्या 9,405 बेडमध्ये एक ऑगस्ट रोजी 307 (म्हणजेच 3.26 टक्के) भरले होते. दोन ऑगस्ट रोजी 3.75 टक्के तर तीन ऑगस्ट रोजी चार टक्के झाले. त्यानंतर यामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. 16 ऑगस्ट रोजी ही संख्या 6.24 टक्के इतकी झाली. 14 ऑगस्ट रोजी 6.21 टक्के तर 15 ऑगस्ट रोजी 6.31 टक्के इतकी संख्या होती.
घाबरु नका पण मास्क वापराच -
राजधानी दिल्लीमध्ये 12 दिवसांपासून दररोज दोन हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या पाहाता डॉक्टरांनी दिल्लीकरांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहनही केले आहे. राजधानी दिल्लीमध्ये 9000 हजार पेक्षा जास्त बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवले आहेत. त्यासोबत 20 आयसीयू बेड राखीव ठेवले आहेत. सध्या दिल्लीमध्ये 65 रुग्ण व्हेटिलेशनवर आहेत.
दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्लीमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर 1,227 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. रविवारी राजधानी दिल्लीमध्ये दोन हजार 162 नवे रुग्ण आढळले होते आणि पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्याआधी दिल्लीमध्ये दोन हजार 31 नवे रुग्ण आढळले होते आणि 9 जणांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी (12 ऑगस्ट) राजधानी दिल्लीमध्ये 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर 2,136 नवीन रुग्ण आढळले होते. 13 फेब्रुवारीरोजी दिल्लीमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता.
देशात सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांहून कमी रुग्ण -
मंगळवारी दिवसभरात 9,062 नवीन कोरोना रुग्णांनी नोंद झाली आहे. सोमवारच्या तुलनेनं कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र दिलासादायक बाब अशी की, देशात सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांहून कमी रुग्ण आढळले आहेत. दुसरी चांगली बाब म्हणजे नवीन कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 15 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 5 हजार 58 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मंगळवारी दिवसभरात देशात 15 हजार 220 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.