Homi Bhabha: दीड वर्षात अणुबॉम्ब तयार करु, होमी भाभांच्या वक्तव्यानंतर लगेचच अपघाती मृत्यू; अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेचा हात असल्याची चर्चा
Homi J. Bhabha Death Anniversary: व्हिएन्ना येथे एका अणुऊर्जा परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जाताना 24 जानेवारी 1966 रोजी फ्रान्सच्या माउंट ब्लॅकच्या परिसरात डॉ. होमी भाभांच्या विमानाचा अपघात झाला.
Homi Bhabha Death Anniversary: सरकारने जर परवानगी दिली तर दीड वर्षात अणुबॉम्ब तयार करु असं डॉ. होमी भाभा यांनी वक्तव्य केलं आणि त्यामुळे जग हादरुन गेलं. विशेषत: अमेरिकेच्या पायाखालची वाळूच सरकली. पण या जाहीर वक्तव्यामुळे भारताचं मोठं नुकसान झालं, कारण त्यानंतर काहीच दिवसात डॉ. होमी भाभांचा अपघाती मृत्यू झाला. होमी भाभांच्या मृत्यूमागे अमेरिकेची गुप्तचर संघटना, सीआयएचा (CIA) हात असल्याची चर्चा होती.
भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक म्हणजे डॉ. होमी भाभा. व्हिएन्ना येथे एका अणुऊर्जा परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जाताना 24 जानेवारी 1966 रोजी फ्रान्सच्या माउंट ब्लॅकच्या परिसरात त्यांचे विमान क्रॅश झाले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी साजरी केली जात आहे.
दीड वर्षात अणुबॉम्ब तयार करण्याची भारताची क्षमता
दुसऱ्या महायुद्धानंतर जग अमेरिका आणि सोव्हिएत रशिया अशा दोन गटात विभागलं गेलं होतं. त्यात अमेरिका आणि सोव्हिएतमध्ये अणुबॉम्बच्या निर्मितीची स्पर्धाच सुरू होती. हे तंत्रज्ञान कुणाच्या हाती लागू नये म्हणून हे दोन्ही देश खूप काळजी घेत होते. आपल्याला भारत सरकारने परवानगी दिली तर केवळ 18 महिन्यात अणुबॉम्ब तयार करु असं वक्तव्य डॉ. होमी भाभा यांनी 1965 साली ऑल इंडिया रेडिओला दिलेल्या एका मुलाखतीत केलं होतं. कृषी आणि मेडिसिन क्षेत्रात अणुऊर्जा कार्यक्रमाचा उपयोग व्हावा असे डॉ. भाभांनी सांगितलं होतं. पण त्यांच्या या वक्तव्यानंतर अमेरिकेसह जग हादरलं होतं. कारण तो काळ म्हणजे केवळ अमेरिका, रशियासारख्या विकसित देशांकडे अणुबॉम्ब असण्याचा काळ होता.
व्हिएन्ना परिषदेला जाताना विमानाचा अपघात
डॉ. होमी भाभा यांनी केलेल्या या वक्तव्यावर विकसित देशांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. अमेरिकेला डॉ. होमी भाभांच्या क्षमतेवर विश्वास होता. त्यामुळे होमी भाभांच्या प्रत्येक हालचालींवर अमेरिकेची करडी नजर होती. व्हिएन्ना येथे एका अणुऊर्जा परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जाताना 24 जानेवारी 1966 रोजी फ्रान्सच्या माउंट ब्लॅकच्या परिसरात होमी भाभांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
CIA: अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेचा हात?
डॉ. होमी भाभा यांच्या मृत्यूमागे अमेरिकन गुप्तचर संघटना सीआयएचा हात असल्याची चर्चा होती. नंतरच्या काळात अनेक अहवालांतून हेच सांगण्यात आलं. पण अमेरिकेने यावर कोणतेही भाष्य केलं नाही. होमी भाभा यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा भारताच्या अणुविकास कार्यक्रमाला बसलेला एक मोठा धक्का होता.
Nobel Prize: नोबेलसाठी तब्बल पाच वेळा नामांकन
नोबेल पुरस्कार विजेते सर सी.व्ही.रमण हे डॉ. भाभा यांना 'भारताचा लियोनार्डो द विन्सी' म्हणायचे. विज्ञानाव्यतिरिक्त त्यांना संगीत, चित्रकला आणि नृत्य अशा अनेक विषयात रुची होती. डॉ. भाभा यांना तब्बल पाच वेळा भौतिकशास्त्राच्या नोबेलसाठी नामांकन मिळाले होते. पण दुर्दैवाने त्यांना या पुरस्कारापासून वंचित रहावे लागले. त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार प्राप्त झाला. डॉ. भाभांनी भारताच्या रचलेल्या अणुऊर्जेच्या पायावरच भारताने 18 मे 1974 साली पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वीपणे पार पाडली. त्यानंतर 11 मे आणि 13 मे 1998 रोजी भारताने दुसरी अणुचाचणी घेतली.
ही बातमी वाचा: