'सुल्तान' रेड्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; 21 कोटींची लागली होती बोली
'सुल्तान' रेडा 6 फूट उंच होता. त्याचे वजन 1.5 टन होते. 'सुल्तान' एका दिवसात 10 लीटर दूध, 15 किलो सफरचंद, 20 किलो गाजर, 10 किलो धान्य आणि 10-12 किलो हिरवी पाने खायचा.
चंढीगड : हरियाणामध्ये 'सुल्तान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेड्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या रेड्याची किंमत जवळपास 21 कोटी रुपये होती आणि हा रेडा त्याच्या मालकाला कोट्यवधी रुपये कमवून देत असे. राजस्थानच्या पुष्करमध्ये दरवर्षी भरणाऱ्या जनवरांच्या जत्रेत एका आफ्रिकन शेतकऱ्याने 'सुल्तान'साठी कोट्यवधी रुपयांची बोली लावली होती. एवढी मोठी बोली लागूनही सुल्तानच्या मालकाने त्याला विकण्यास नकार दिला होता.
एका म्युझिक अल्बममध्ये देखील सुल्तान दिसला होता. सुल्तान गेल्याचं दु:ख मालक नरेश त्यांच्यासाठी मोठं आहे. सुल्तान गेल्यानंतर आणखी एक रेडा घेऊन त्याला मोठं करु, पण सुल्तानची जागा कुणीही घेऊ शकत नाही, असं नरेश सांगतात.
'सुलतान'च्या मृत्यूनंतर त्याचे मालक नरेश खूप दु:खी आहेत. नरेश हरियाणाच्या कैथल जिल्ह्यात राहतात. नरेश यांनी सुल्तानला लहानाचं मोठं केलं, त्यामुळे त्याची कमतरता त्यांना नक्की भासेल. सुल्तानच्या वीर्यापासून शेकडो रेडे आणि म्हशींची निर्मिती झाली. वीर्याच्या विक्रीतून नरेश यांनी लाखोंची कमाईही केली. एका वर्षात तब्बल 30 हजाराहून अधिक विर्याचे डोस नरेश विकत असत.
21 कोटींची बोली लागूनही विकण्यास नकार
राजस्थानातील पुष्कर जत्रेत एका व्यक्तीने सुलतानवर 21 कोटी रुपयांची बोली लावली होती. पण नरेश यांनी त्यावेळी सुल्तानला विकण्यास नकार दिलता. सुल्तान हा माझा मुलगा आहे आणि मुलाची किंमत केली जात नाही, असं नरेश यांनी म्हटलं होतं. तेव्हापासून सुल्तान देशभरात चर्चेचा विषय होता.
सुल्तानच्या नावावर अनेक पुरस्कार
'सुल्तान'चा देशभरातील पशु मेळ्याव्यात दबदबा होता. त्याने अनेक जत्रांमध्ये पुरस्कारही मिळवले होते. तंदुरुस्त दिसणाऱ्या 'सुल्तान'ने राष्ट्रीय प्राणी सौंदर्य स्पर्धेत 2013 मध्ये हिसार, झज्जर आणि कर्नालमधून राष्ट्रीय विजेतेपद मिळवले होते.
'सुलतान'ची वैशिष्ट्ये काय होती?
'सुल्तान' रेडा 6 फूट उंच होता. त्याचे वजन 1.5 टन होते. 'सुल्तान' एका दिवसात 10 लीटर दूध, 15 किलो सफरचंद, 20 किलो गाजर, 10 किलो धान्य आणि 10-12 किलो हिरवी पाने खात असत. सुल्तानला दारू देखील पाजली जात असे.