Exclusive: ज्यांच्यावर टीका केली, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवणार का? हार्दिक पटेलने केला खुलासा
Hardik Patel : काँग्रेस सोडल्यानंतर हार्दिक पटेल हे भाजपमध्ये प्रवेश करतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. परंतु, त्यांनी अद्याप याबाबत स्पष्ट सांगितलेले नाही.
Hardik Patel : पाटीदार समाज्याच्या आंदोलनातून पुढे येत देशभर चर्चेत राहणारे तरूण नेते म्हणजे हार्दिक पटेल. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी हार्दिक पटेल गुजरातमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. याच हार्दिक यांनी नुकताच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आता काँग्रेसचा राजीनामा देण्याचे कारण सांगितले आहे.'मला काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही. शिवाय काँग्रेसमध्ये माझे ऐकले गेले नाही, त्यामुळे आपण राजीनामा दिला असे हार्दिक यांनी म्हटले आहे. हार्दिक पटेल यांनी एबीपी न्यूजला एक मुलाखत दिली असून यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींवर आपले मत व्यक्त केले आहे.
राहुल गांधींमुळे आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु, ते काँग्रेसमध्ये माझा बचाव करू शकले नाहीत. अशा व्यक्तीसोबत काम करण्याचे काय फायदे आहेत? मी माझ्या राजीनाम्यात कुठेही राहुल गांधींचा उल्लेख केलेला नाही. मी माझा राजीनामा सोनिया गांधींकडे पाठवला होता, त्यांच्याबद्दल माझी कोणतीही नाराजी नाही, असे हार्दिक पटले यांनी म्हटले आहे.
हार्दिक पटेल म्हणाले, 'राजकारणात माझा कोणताही गॉडफादर नव्हता, माझे वडील आमदार किंवा मंत्री नव्हते. युवा नेता म्हणून मी काँग्रेस सोडत असून मला काळजी करण्याची काहीच गरज नाही. काळजी त्यांनी केली पाहिजे, ज्यांच्यापासून 70 वर्षांचे वृद्ध आणि 28 वर्षांचे तरुण दोघेही दूर जात आहेत. काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता माझ्या दुःखात सहभागी झाला नाही. माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर काँग्रेसमधील कोणी आले नाही."
काँग्रेस सोडल्यानंतर हार्दिक पटेल हे भाजपमध्ये प्रवेश करतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यावर बोलताना हार्दिक म्हणाले, "तुम्ही एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून म्हणत असाल की माझे भाजप आणि संघ परिवाराशी संबंध आहेत. तर संबंध आहेत असे मानू या. संघाशी नाही पण आम्ही भाजपशी नक्कीच जोडलेलो होतो. आनंदीबेन पटेल जेव्हा मंडलमधून निवडणूक लढवत होत्या तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांना भाऊ मानले होते. माझे वडील त्यावेळी सबमर्सिबल पंपाचा व्यवसाय करत होते आणि त्यांचा एक कमांडर होता, ज्याच्यासोबत आनंदीबेन पटेल त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी जात असत. माझ्या वडिलांशी भाजपचे नाते होते.
राहुल गांधींवर टीका
यावेळी हार्दिक पटेल यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. महिनाभरापासून काँग्रेस नेतृत्व मला त्रास देत असल्याचे आणि मी नाराज असल्याचे राहुल गांधींना माहिती होते. अनेक वर्षांनंतर राहुल गांधी दाहोदला 6 तास रॅलीसाठी येतात, त्यावेळी आमच्यासारखे तरुण नेत्यांना राहुल गांधी पाच मिनिटे भेटू शकत नाहीत का? असा प्रश्न हार्दिक पटेल यांनी उपस्थित केला.