(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Happy New Year 2021: कुठं बंदी तर कुठं जल्लोष, देशभरात नववर्षाचं स्वागत
Happy New Year 2021: देशभरात 2021 नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. अर्थात या स्वागताला अनेक ठिकाणी निर्बंध होते. काही ठिकाणी निर्बंध पाळत तर काही ठिकाणी मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. कोरोना महामारीमुळं देशातील अनेक शहरात नाईट कर्फ्यू होता.
मुंबई : कोरोनामुळं 2020 वर्ष संकटाचं ठरलं. काही चांगल्या वाईट आठवणी हे वर्ष देऊन गेलं. आता 2021 नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. अर्थात या स्वागताला अनेक ठिकाणी निर्बंध होते. मात्र काही ठिकाणी निर्बंध पाळत तर काही ठिकाणी मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. कोरोना महामारीमुळं देशातील अनेक शहरात नाईट कर्फ्यू होता. मात्र गोवा, पाटणा, भोपाळसारख्या अनेक शहरांत लोकांनी रस्त्यावर उतरुन जल्लोषात स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाच्या नव्या प्रकाराची भारतात एन्ट्री झाल्यानं सरकारनं नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनवर कडक निर्बंध घातले होते.
केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांना नवीन वर्षाच्या या स्वागताच्या जल्लोषावर आणि गर्दीवर नियंत्रणासंदर्भात कडक निर्बंध घालण्याबाबत निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, जुहू बीच आणि समुद्र किनाऱ्यांवर गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांकडून 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये देखील नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती. तर उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश राज्य सरकारांनी देखील नवीन वर्षाच्या जल्लोषावर निर्बंध घातले होते.
मुंबईत ड्रिंक अँड ड्राईव्ह केसमध्ये सहप्रवाशांविरुद्धही कारवाई मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, जुहू बीच आणि समुद्र किनाऱ्यांवर गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. दरवर्षी ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये ब्रीथ अॅनालायझरने मद्यपान केलं आहे की नाही याची चाचणी केली जात होती. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्लड टेस्ट करून चालकाने मद्यपान सेवन केलं आलं आहे की नाही याची तपासणी करण्यात आली. रात्री 2 वाजेपर्यंत ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये 20 जणांवर कारवाई केल्याची माहिती आहे. कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता मद्यपानाचे सेवन करून गाडी चालवणाऱ्यांची रक्त चाचणी केली जाणार आहे आणि जर त्यांनी मद्यपानाचे सेवन केलं असेल तर त्यांच्यावर मोटर व्हेईकल ऍक्ट नुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गाडीत असणाऱ्या सहप्रवाशांविरुद्ध सुद्धा पेंडमिक अॅक्टनुसार कारवाई केली जाईल.
नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली
20 व्या शतकाला निरोप देताना जल्लोष करण्यासाठी सरकारकडून काही अटी घालण्यात आल्या होत्या. यामध्ये रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली होती. गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन, गिरगाव चौपाटी सरख्या सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली होती.
महाबळेश्वर, पाचगणीत निर्बंध महाबळेश्वर पाचगणीच्या पर्यटकांवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी चाप घातला होता. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरात रात्री पर्यटकांना दहा नंतर बाहेर फिरता आलं नाही.
दिल्लीत नाईट कर्फ्यू दिल्लीमध्ये 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या रात्री 11 ते सकाळी सहा वाजेपर्यंत नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने जल्लोष करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला होता.
कर्नाटक सरकारने राज्याची राजधानी बंगळुरुमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री आणि 1 जानेवारीच्या सकाळी पार्ट्यांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. तर गोव्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात लाखो पर्यटक आले आहेत. भोपाळमध्ये देखील रात्रीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तर इंदोरमध्ये 21 वर्ष वयाच्या आतील मुलांना दारु न देण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थानमधील सर्व प्रमुख शहरात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तिकडे बिहारच्या पाटण्यात मात्र वेगळ्या गाई़डलाईन्स नवीन वर्षासाठी घातलेल्या नव्हत्या. मात्र 200 हून अधिक लोकांना एकत्रित येण्याला बंदी घातली होती. त्यामुळं लोकांनी नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत केलं.