Gold ATM : आता मंदिरातील एटीएममधून सोन्या-चांदीचे शिक्के काढता येणार, तिरुपतीमध्ये पहिली सेवा सुरू
Gold ATM in Tirupati : तिरुपतीमध्ये भगवान वेंकटेश्वर आणि गोविंदराज स्वामींच्या रूपात सोन्या-चांदीचे कॉइन उपलब्ध आहे. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून ते एटीएममधून घेता येणार आहेत.

मुंबई : तुम्ही ATM मशीन मधून डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ने पैसे काढता, पण याच ATM मशीन मधून डेबिट क्रेडिट कार्ड किंवा UPI वापरून आता थेट सोन्याचे सिक्के तुम्हाला काढता आले तर? हैदराबादच्या एका कंपनीनं असे मशीन बनवले आहे.त्याचे उद्घाटन हे तिरुपती येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय मंदीर परिषदेत झाले आहे.
अनेक वेळा आपण मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरातून त्या मंदिराशी जोडलेल्या वस्तू घेत असतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन मंदिरांसाठी विशेष ATM मशीन सारखे दिसणारे मशिन बनविण्यात आले आहे ज्यातून आपण सोने आणि चांदीचे कॉइन डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ने घेऊ शकतो.
एटीएममधून सोन्या-चांदीचे शिक्के
तुमच्या जवळ असलेल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ने अथवा UPI ने तुम्ही हव्या त्या रकमेचे ट्रांन्झेक्शन केले की जसे ATM मधून पैसे येतात तसे या मशीनमधून शिक्के येतात. यात विशेष बाब म्हणजे सोने आणि चांदीचे प्रति ग्रॅमचे भाव हे मशिन तुम्हाला दाखवते आणि त्यावरून आपल्या खिशाला परवडेल असा पर्याय आपल्याला वापरता येतो. पेमेंटची प्रोसेस संपल्यावर या मशीन मधून जीएसटी आणि मेकिंग चार्जसकट एक बिल बाहेर येते.
मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुपती येथे सुरू असलेल्या इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेंशनमध्ये या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. या मंदिर परिषदेला आलेल्या अनेक मंडळींनी या मशीनमधून आपल्याला हवे ते कॉइन ATM मधून काढले.
सर्टिफाईड नंबर आणि हॉलमार्क
या एटीएमची संकल्पना मंदिरांसाठी करण्यात आली आहे. अनेक वेळा आपण मंदिरात सोने चांदी दान करतो किंवा भेट देताना दैवतांचे कोरीव असलेले शिक्के देतो. त्यामुळे हे मशीन ज्या मंदिरात असतील त्या त्या ठिकाणावरील देवतांचे रुप तुम्हाला या शिक्क्यांवर पाहायला मिळेल. सध्या तिरुपतीमध्ये भगवान वेंकटेश्वर आणि गोविंदराज स्वामींच्या रूपात हे कॉइन उपलब्ध आहे.
कोणत्याही सोनाराच्या दुकानात न जाता सोने आणि चांदींची खरेदी करण्यात येत असल्याने खरे की खोटे? गॅरंटी काय? हॉलमार्क कुठे? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या गोष्टी लक्षात घेता ATM मधून बाहेर येणाऱ्या कॉइनच्या पॅकेजिंगवर ट्रस्ट आणि प्यूरिटी असे लिहिण्यात आले आहे. तसेच सर्टीफाईड नंबरही पाहायला मिळत आहे. सोबतच हॉल मार्कही असल्याने याची पडताळणीही होते.
अनेक जण या ठिकाणी आता हे शिक्के विकत घेताना पाहायला मिळत आहे. तर भविष्यातही ATM मशिन किती मंदिरात पाहायला मिळणार याचीही उत्सुकता आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
