Dance Bar : महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी मैदानात उतरू, डान्सबार विरोधात आर आर आबांच्या लेकाचा सरकारला इशारा
Maharashtra Dance Bar News : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांनी 2005 साली राज्यातील डान्सबारवर बंदी आणली होती. आता राज्य सरकार पुन्हा एकदा डान्सबार सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

सांगली : डान्सबार कायदा सुधारणेबाबत राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली असून राज्य सरकार पुन्हा डान्सबार सुरू करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसतंय. मात्र सरकारच्या या चर्चेवरुन शरद पवारांचे आमदार रोहित पाटलांनी चांगलाच इशारा दिला आहे. सरकार जर डान्सबार सुरू करण्याचा घाट घालत असेल तर महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरु असा इशारा रोहित पाटलांनी दिला. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील हे गृहमंत्री असताना, 2005 साली त्यांनी डान्सबार बंदी केली होती. आता राज्यात पुन्हा एकदा छमछमचा आवाज घुमण्याची शक्यता असून डान्सबार सुरू करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. डान्सबारसंबंधी नवीन कायद्यावर चर्चा झाल्याची माहिती असून लवकरच हा कायदा विधानसभेत मांडला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकार जुन्या कायद्यात सुधारणा करून नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे.
यावर आर आर पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरू असा इशारा त्यांनी दिला.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने 2005 मध्ये राज्यातील डान्सबारवर बंदी घातली होती. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तशी घोषणा केली होती. आर. आर. पाटील यांच्या या निर्णयाचे राज्यात जोरदार स्वागत झाले होते. मात्र, डान्सबार मालकांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2019 मध्ये ही बंदी उठवत काही नियम लागू करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आता राज्य सरकार नियमात बदल करून डान्सबार सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा:























