मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गोव्यात परतले
प्रकृती सुधारलेली नसताना देखील वायुदलाच्या विशेष हवाई अॅम्बुलन्सने ते गोव्यात आले. पर्रिकर विमानतळावरुन आपल्या दोनापावल येथील खासगी घरी गेले.
पणजी : मागील 29 दिवस दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आज गोव्यात परतले आहेत. प्रकृती सुधारलेली नसताना देखील वायुदलाच्या विशेष हवाई अॅम्बुलन्सने ते गोव्यात आले. पर्रिकर विमानतळावरुन आपल्या दोनापावल येथील खासगी घरी गेले.
अमेरिकेत तीनवेळा उपचार घेऊन आल्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांनी कांदोळी येथील दुकळे हॉस्पिटल मध्ये 4 दिवस उपचार घेणे पसंत केले होते. 16 सप्टेंबर रोजी दिल्लीला जाण्यापूर्वी पर्रिकर यांनी आघाडी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून आपल्या आजारपणामुळे राज्य कारभारावर होत असलेल्या परिणामाबाबत चर्चा केली होती. शिवाय भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्री पद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार 16 सप्टेंबर रोजी विशेष विमानने पर्रिकर यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. पर्रिकर एम्समध्ये 45 दिवस उपचार घेऊनच परत येतील असे त्यावेळी सांगितले जात होते. त्यामुळे भाजपने 3 निरीक्षक पाठवून पर्रिकर यांच्या गैरहजेरीत सरकार कसे चालवायचे याचा आढावा घेतला होता. त्यानंतर आजारपणावर उपचार घेत असले तरी मुख्यमंत्रीपदी पर्रिकर हेच राहतील, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केलं होतं.
पर्रिकर यांच्याकडे जवळपास 32 खाती आहेत. त्यातील काही खाती इतर मंत्र्यांना देऊन त्यांच्यावरील भार कमी करण्याचे भाजप नेत्यांनी ठरवले होते. त्यासाठी पर्रिकर यांनी 12 ऑक्टोबर रोजी आघाडी पक्षाच्या नेत्यांना एम्समध्ये बोलावून त्यांच्यासोबत चर्चा केली होती. दसऱ्यानंतर हे खातेवाटप होईल अशी चर्चा होती.
मात्र त्यापूर्वीच पर्रिकर गोव्यात दाखल झाल्याने आता पुढे काय होणार याचे उत्तर अद्याप मिळाले नाही. मुख्यमंत्री आजारी असल्याने प्रशासन ठप्प झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारला घेरले आहे. भाजपमध्ये देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे. पर्रिकर यांची पकड सुटत असल्याने गोव्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर बनत चालली आहे.
आज पर्रिकर गोव्यात दाखल झाले असले तरी त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. एम्समधून त्यांना स्ट्रेचरवरुन नेतानाचा फोटो समोर आला आहे. त्याशिवाय पर्रिकर यांना वायुदलाच्या एयर अॅम्बुलन्समधून गोव्यात आणावे लागले आहे. पर्रिकर यांच्यावर उपचार करण्यासाठी एम्सचे एक पथक त्यांच्यासोबत गोव्यात आले आहे.