(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gaganyaan : गगनयान मोहिमेचं पहिलं पाऊल! उड्डाण चाचणी, यशस्वी चाचणीनंतर बंगालच्या खाडीतून क्रू मॉड्यूल सापडलं
Gaganyaan Mission : इस्रोच्या गगनयान मोहिमेची पहिली उड्डाण चाचणी शनिवारी यशस्वीरित्या पार पडली. बंगालच्या उपसागरात गगनयानचं क्रू मॉड्यूल सापडलं.
Gaganyaan Test Flight : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) पहिल्या मानवी मोहिमेसाठी सज्ज आहे. इस्रो (ISRO) च्या गगनयान (Gaganyaan) मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला आहे. इस्रोच्या गगनयान मोहिमेची पहिली उड्डाण चाचणी शनिवारी, 21 ऑक्टोबर रोजी यशस्वीपणे पार पडली आहे. चाचणीनंतर गगनयान मोहिमेचं क्रू मॉड्यूल बंगालच्या उपसागरात सापडलं आहे. क्रू मॉड्यूल सापडल्यानंतर ते चेन्नई बंदरात आणण्यात आलं आहे.
यशस्वी चाचणीनंतर बंगालच्या खाडीतून क्रू मॉड्यूल सापडलं
इस्रोच्या महत्त्वाकांक्षी पहिल्या मानवी मोहिमेतील अबॉर्ट मिशन-1 (TV-D1) चं प्रक्षेपण (ISRO Gaganyaan Crew Module Abort Test) 21 ऑक्टोबरला करण्यात आलं. इस्रो प्रमुखांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी सांगितलं की, गगनयानचं क्रू मॉड्युल बंगालच्या उपसागरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. पहिलं चाचणी उड्डाण यशस्वी झाल्यानंतर क्रू मॉड्यूलला कोणतंही नुकसान झालेलं नाही. क्रू मॉड्यूलचा सर्व डेटा ठीक आहे. गगनयानची पहिली उड्डाण चाचणी क्रू एस्केप सिस्टमसाठी होती आणि ती साध्य झाली आहे.
#WATCH | Gaganyaan Mission: After the successful touch down of the crew escape module, ISRO chief S Somanath congratulates scientists pic.twitter.com/YQp6FZWXec
— ANI (@ANI) October 21, 2023
मास इग्निशनमध्ये समस्येमुळे लाँच होण्यास विलंब
वृत्तसंस्था ANI च्या वृत्तानुसार, इस्रो (ISRO) ने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (Satish Dhawan Space Centre) येथून गगनयान मिशनमध्ये टेस्ट व्हेईकल डेव्हलपमेंट फ्लाइट 1 (TV-D1) चं पहिलं चाचणी उड्डाण प्रक्षेपित केलं. शनिवारी, 21 ऑक्टोबरला सकाळी 8:45 वाजता लाँचिंग होणार होतं, पण इंजिनच्या इग्निशनमध्ये समस्या निर्माण झाल्याने या चाचणीला उशीर झाला आणि सकाळी 10 वाजता प्रक्षेपण करण्यात आलं.
अबॉर्ट टेस्ट कशासाठी?
गगनयान मोहिमेची अबॉर्ट टेस्ट म्हणजे क्रू एस्केप सिस्टमची चाचणी. अबॉर्ट टेस्ट ही अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठीची येणारी चाचणी आहे. गगनयान मोहिमेदरम्यान तांत्रिक बिघाड किंवा अडचण निर्माण झाल्यास अंतराळवीरांची सुरक्षितपणे सुटका व्हावी आणि त्यांना सुरक्षित पृथ्वीवर आणण्यासाठीच्या प्रणालीची ही चाचणी आहे. गगनयान अबॉर्ट टेस्टमध्ये गगनयानचं क्रू मॉड्यूलचं लाँच व्हेईकलद्वारे प्रक्षेपण करण्यात आलं. क्रू मॉड्यूलने अवकाशात भरारी घेऊन त्यानंतर ठराविक उंची गाठल्यानंतर क्रू मॉड्यूल रॉकेटपासून वेगळं झालं आणि समुद्रात लँड झालं. बंगालच्या उपसागरात क्रू मॉड्यूलने टचडाउन केल्यानंतर, भारतीय नौदलाच्या जहाजाने क्रू मॉड्यूल पुन्हा ताब्यात घेतलं.