Fuel Price Hike: वाढत्या महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक, आज करणार देशभर आंदोलन
वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचा हल्लाबोल सुरु आहे.
Fuel Price Hike : देशात दिवसेंदिवस महागाईचा भडका वाढत असल्याचे दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ होत आहे. या वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचा हल्लाबोल सुरु आहे. दरम्यान,काँग्रेस आज वाढत्या महागाईच्या विरोधात देशभरात रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे.
लखनौ येथील काँग्रेस कार्यालयात काँग्रेस प्रवक्त्यांनी मोदी सरकारला चांगलेच घेरले. 62 कोटी अन्नदाते कराच्या ओझ्याखाली दबले जात आहेत. रोज सकाळी पंतप्रधान इंधनाच्या किंमती वाढवून देशातील जनतेला गुड मॉर्निंगचा संदेश देतात. गेल्या 16 दिवसांमध्ये इंधनाच्या किंमती 14 वेळा वाढल्या असल्याचे गौरव वल्लभ म्हणाले.
युवक काँग्रेसचेही दरवाढीविरोधात निदर्शने
दरम्यान, बुधवारी हरियाणातील भिवानी येथे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीविरोधात निदर्शने केली. हंसी गेट येथे युवक काँग्रेसच्या आंदोलकांनी भाजप सरकारच्या पुतळ्याचे दहन केले आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
भाजप जनतेची लूट करण्यात मग्न
भाजप सत्तेत आल्यापासून जनतेची लूट करण्यात मग्न असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास कुमार यांनी केला. सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. कुमार यांनी सरकारला पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या वाढलेल्या किंमती मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय तेल कंपन्यांनी गुरुवारसाठी पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. सातत्यानं वाढणाऱ्या इंधन दरवाढीपासून आज सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे आज देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशात 22 मार्चनंतर आजपर्यंत 14 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. या दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरांत 10 रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी 4 नोव्हेंबर, 2021 नंतर जवळपास चार महिन्यांपर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केली नव्हती. या दरम्यान, ग्लोबल मार्केटमध्ये कच्चं तेल 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेलं होतं. त्यावेळी तेल कंपन्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
- Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; परभणीत देशात सर्वात महाग पेट्रोल, इतर शहरांत परिस्थिती काय?
- लक्षद्वीपमध्ये प्रशासकांची एकाधिकारशाही, त्यातून मार्ग काढण्यासाठी मोदींची भेट: शरद पवार
- Article 370: कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये किती लोकांना मिळाल्या नोकऱ्या? केंद्र सरकारने दिली माहिती