(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोव्यात दाबोळी विमानतळावर 22 लाख विदेशी चलनासह चौघांना अटक
विमानतळावरील कस्टमच्या अधिकाऱ्यांनी संशयास्पदरित्या वावरत असलेल्या चार विदेशी प्रवाशांवर पाळत ठेवली होती.
पणजी : दाबोळी विमानतळावर 22 लाख 30 हजार रुपये किमतीचे विदेशी चलन जप्त करण्यात कस्टम विभागाला यश आलं आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री ही कारवाई केली. याप्रकरणी चार विदेशी प्रवाशांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
गोवा कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील कस्टमच्या अधिकाऱ्यांनी संशयास्पदरित्या वावरत असलेल्या चार विदेशी प्रवाशांवर पाळत ठेवली होती. यामध्ये हे चार जण चलनाची तस्करी उघडकीस आली. हे चौघे विदेशी प्रवासी एअर अरेबियाच्या विमानाने शारजाहला जाण्याच्या तयारीत होते.
कस्टमच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांची चौकशी केली. मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अधिकाऱ्यांनी त्यांच्या सामनाची तपासणी केली असता त्यांच्याकडे 22 लाख 30 हजार किमतीचे विदेशी चलन आढळून आले.
ताब्यात घेतलेल्या प्रवाशांनी आपण विदेशी चलनाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात होतो, अशी कबुली अधिकाऱ्यांकडे दिली आहे. हवाई प्रवासादरम्यान एवढी मोठी रक्कम बाळगणे कायद्यानुसार गुन्हा असल्याने कस्टमच्या अधिकाऱ्यांनी हे विदेशी चलन जप्त करून चारही प्रवाशांना ताब्यात घेतलं आहे.
या सर्वांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गोवा कस्टमचे अतिरिक्त आयुक्त टी.आर. गजलक्ष्मी यांच्यामार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास गोव्याचे कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कस्टम आयुक्त व इतर अधिकारी करीत आहेत.