Atmanirbhar 3.0 : देशाची अर्थव्यवस्था वेगाने सावरतेय; देशभरात रेकॉर्डब्रेक जीएसटीचा परतावा : अर्थमंत्री
देशाची अर्थव्यवस्था वेगाने सावरत असल्याचं देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे. तसेच देशभरात रेकॉर्डब्रेक जीएसटीचा परतावा झाला असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सगळे उद्योगधंदे ठप्प होते. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. अशातच देशाची अर्थव्यवस्था वेगाने सावरत असल्याचं देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे. तसेच देशभरात रेकॉर्डब्रेक जीएसटीचा परतावा झाला असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
मूडीजने देशाचा जीडीपीत सुधारणा होत असल्याचं सांगितल : अर्थमंत्री
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "मूडीजने देशाच्या जीडीपीमध्ये सुधारणा होत असल्याचं सांगितलं आहे. आता मूडीजने देशाचा जीडीपी 8.9 टक्क्यांवर असल्याचं सांगितलं आहे." पुढे बोलताना त्यांनी परदेशी गुंतवणुकीतही वाढ झाली असल्याचं सांगितलं. यादरम्यान, त्यांनी सांगितलं की, अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होत आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाखांवरून कमी होऊन 4.89 लाखांवर आली आहे. कोरोना व्हायरसच्या मृत्यू दरातही घट होऊन 1.47 टक्के झाली आहे.
बँकांची क्रेडिट ग्रोथही वाढली : सीतारमण
निरर्मला सीतारमण यांनी बोलताना सांगितलं की, "आता देशातील बँकांची क्रेडीट ग्रोथही वाढत आहे." अर्थमंत्र्यांसोबत या पत्रकार परिषदेत अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूरही उपस्थित होते.
अनुराग ठाकूर यांनी यावेळी सांगितलं की, "देशात पैसे आणि अन्नाची काहीच कमतरता राहू नये, यासाठी आत्मनिर्भर भारताप्रमाणे सरकारने निश्चय केला होता. याच संबंधात अर्थमंत्री सीतारमण यांनी घोषणा केली होती की, 'एक देश, एक बाजार' च्या आधारावर 'एक देश, एक रेशन कार्ड' अशी मोहीम राबवली होती. सरकारने आधीच राज्यांकडून 'एक देश, एक रेशन कार्ड' लागू करण्यास सांगितलं होतं. आता 18 राज्यांमध्ये ही सुविधा लागू करण्यात आली आहे.'
शेतकऱ्यांना एक लाख 43 हजार 262 कोटी रुपये देण्यात आले : सीतारमण
किसान क्रेडिट कार्ड संदर्भात अर्थमंत्री म्हणाले की, "आतापर्यंत एक कोटी 83 लाख 14 हजारांहून जास्त अर्ज करण्यात आले होते. त्यामध्ये बँकांनी एक कोटी 57 लाख 44 हजारांहून अधिक किसान क्रेडिट कार्ड योग्य आहेत. एकूण एक लाख 43 हजार 262 कोटी रुपये दोन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, निर्मला सीतारमण आज इमर्जंन्सी क्रेडिटची सुविधा देण्याची घोषणा करू शकतात. यामुळे हॉटेल, टूरिज्म आणि एविएशन सेक्टरला फायदा होईल. एवढंच नाही तर असं सांगण्यात येत आहे की, यामुळे ऑटोडीलर, टेक्सटाईल सेक्टरलाही फायदा होणार आहे.