(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Farmers Protest : केंद्र सरकारने पुन्हा शेतकर्यांशी चर्चा करावी, शेतकऱ्यांच्या निषेध आंदोलनाला 12 पक्षांचा पाठिंबा
दिल्लीतल्या शेतकरी आंदोलकांनी 26 मे रोजी जाहीर केलेल्या निषेध आंदोलनाला देशातल्या 12 पक्षांचा पाठिंबा जाहीर केला आहे. 26 मे रोजी आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत असल्याने संपाची घोषणा शेतकरी आंदोलकांनी केली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतल्या शेतकरी आंदोलकांनी 26 मे रोजी जाहीर केलेल्या निषेध आंदोलनाला देशातल्या 12 पक्षांचा पाठिंबा जाहीर केला आहे. 26 मे रोजी आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत असल्याने संपाची घोषणा शेतकरी आंदोलकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर 12 विरोधी पक्षांनी एक पत्रक काढून या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारने पुन्हा शेतकर्यांशी चर्चा सुरू करावी ही मागणी यात केली आहे.
तातडीने कृषी कायदे मागे घ्यावेत. काँग्रेससह, राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींसह देशातल्या 12 विरोधी पक्ष नेत्यांनी हे संयुक्त पत्र लिहिलं आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही दिल्लीतलं शेतकरी आंदोलन सुरु
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही दिल्लीतलं शेतकरी आंदोलन सुरु आहे. जवळपास सहा महिन्यांपासून हे आंदोलन सुरु आहे. हिवाळा संपला..उन्हाळा सुरु झाला.कोरोनाची पहिली लाट गेली. आता दुसरी आली..पण दिल्लीतलं शेतकरी आंदोलन अजूनही सुरुच आहे. गाझीपूर सीमेवर जवळपास दोन किलोमीटर लांबवर हे तंबू अजूनही आपले आंदोलनाचे झेंडे फडकावत उभेच आहेत.शेतकऱ्यांची संख्या थोडीशी कमी असली तरी तंबू मात्र हटलेले नाहीत.लंगरही उभेच आहेत. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हटणार नाही असा त्यांचा निर्धार कायम आहे.
दिल्लीत लॉकडाऊन लावला गेलाय. पण या सगळ्या सावटातही आंदोलन सुरु आहे. 26 जानेवारीच्या हिंसाचारानंतर आंदोलन संपतंय की काय अशी चर्चा सुरु झाली होती.पण टिकैत यांच्या नेतृत्वानं पुन्हा आंदोलनाला बळ दिलं. आंदोलनात सध्या कुठला मोठा कार्यक्रम जाहीर झालेला नाहीय. चर्चेसाठी तयार असं सरकारही म्हणतंय,आंदोलकही म्हणतायत.पण ही चर्चा सुरु कुणी करायची हा प्रश्न आहे.सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या मध्यस्थ समितीवर आंदोलकांनी बहिष्कार टाकला...या समितीनं आपला अहवाल कोर्टाला सादर केलाय...त्यावरही सुनावणी लवकरच अपेक्षित आहे.त्यामुळे आता पुन्हा कोर्ट आंदोलनाबाबत काही निर्णय देतंय का पाहावं लागेल...दुसरीकडे शाहीनबागचं आंदोलन कोरोनाचं निमित्त करुन संपवलं तसं आता दुसऱ्या लाटेचं निमित्त करुन सरकार शेतकरी आंदोलन दडपणार का हेही पाहावं लागेल.