Facebook, Instagram, WhatsApp 6 तासांनी सुरु; पण अद्याप तक्रारी कायम
Facebook, Instagram, WhatsApp Down : जगभरात व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा काही वेळासाठी ठप्प झाल्याने नेटकऱ्यांचा हिरमोड झाला. अशातच आता तब्बल 6 तासांनी ही सेवा पूर्ववत झाली आहे.
![Facebook, Instagram, WhatsApp 6 तासांनी सुरु; पण अद्याप तक्रारी कायम facebook instagram and whatsapp start to return online again Facebook, Instagram, WhatsApp 6 तासांनी सुरु; पण अद्याप तक्रारी कायम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/05/5cc2934402be71397353131088ce3ead_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Facebook, Instagram, WhatsApp Down : जगभरात व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा तब्बल सहा तास ठप्प झाल्यानं नेटकरी हैराण झाले होते. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानं अनेक युजर्सना याचा फटका बसला. सोशल मीडिया अकाऊंटवरील अपडेट दिसत नसल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर याचा खुलासा झाला. तब्बल सहा तासांनी व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा पूर्ववत करण्यात आली असली तरी अद्यापही अनेक युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे. कंपनीच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, सेवा सुरळीत होण्यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो.
फेसबुकनं ट्विटरवर म्हटलं आहे की, "आम्ही क्षमस्व आहोत. जगभरातील लोक आणि व्यवसाय आमच्यावर अवलंबून आहेत. आम्ही आमचे अॅप्स आणि सेवा पूर्ववत करण्यासाठी मेहनत करत आहोत. आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, सेवा हळूहळू पूर्ववत होत आहे. या कठीण प्रसंगी आमची साथ देण्यासाठी, धन्यवाद." तसेच, इन्स्टाग्रामच्या वतीनं ट्वीट करुन माहिती देण्यात आली आहे की, "इन्स्टाग्राम हळूहळू पूर्ववत होत आहे. आमची साथ देण्यासाठी धन्यवाद."
दरम्यान, काल संध्याकाळी अचानक जगभरात व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम जगभरात काम करेनासे झाले होते. ट्विटर सुमारे सव्वा तास ठप्प होते. सोमवारी सायंकाळी 9.30 वाजता व्हॉट्सअॅपवर अडथळा येऊ लागला. त्यानंतर रिफ्रेश करूनही माहिती अपडेट होत नसल्याचं दिसून आलं. युजर्सकडून डाऊन झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तर फेसबुकच्या वेबसाईटवर यूजर्ससाठी एक मेसेज लिहिला आहे. "काही कारणांमुळे फेसबुक वापरण्यास अडथळा येत आहे. आम्ही यावर काम करत असून लवकरात लवकर समस्या दूर करू. असुविधेसाठी क्षमस्व."
व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा ठप्प होण्यामागे नेमकी कारणे कोणती होती हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्याने भारतातील लोक सतत हे अकाउंट सुरु झाले का याची तपासणी करत होते. भारतात युजर्सची संख्या मोठी असल्याने भारतातील युजरवर ठप्प झाल्याचा मोठा परिणाम होत आहे.
एका यूजरने ट्वीटरवर पोस्ट लिहिली होती की, सोशल नेटवर्किंग आणि कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मवर भारतीय वेळेनुसार रात्री 9 नंतर वापरण्यास अडचण येत आहे. वेबसाइट downdetector.in या संकेतस्थळावर वेब सर्व्हिसेस ट्रॅक केल्या जातात. यावर असंख्य यूजर्सनी त्यांनी येणाऱ्या अडचणी लिहित तक्रारी केल्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)