Drug Addiction : दुर्गापूरमधील युवकांचा विचित्र नशा, फ्लेवर्ड कंडोमचा नशेसाठी वापर, शहरात कंडोमचा तुटवडा
Condom addiction in youth : युवकांच्या या वाढत्या नशेमुळे त्यांना कॅन्सरचा धोका असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कोलकाता: नशा मानवी शरीरासोबत त्याच्या जीवनालाही संपवते, आपल्या आजूबाजूला असे अनेक घटना घडत असतात. तरीही लोक काही नशा करायचं थांबत नाहीत. आजची तरुण पीढी, विशेषत: शाळकरी मुलं आणि महाविद्यालयातील विद्यार्थी ड्रग्ज व्यतिरिक्त व्हाईटनर, नेलपेंट, ऑईल पेंट, शाई अशा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करत नशाबाजी करतात. पण पश्चिम बंगालमध्ये एक नशेचा वेगळाच प्रकार समोर आला आहे. दुर्गापूरमधील युवक आता नशा करण्यासाठी फ्लेवर्ड कंडोमचा वापर करताना दिसत आहे आणि यामुळे त्या ठिकाणी कंडोमचा तुटवडा निर्माण झाला आहे. या गोष्टीमुळे सर्वजण चक्रावले आहेत.
ही गोष्ट ऐकण्यासाठी विचित्र वाटेल पण हा प्रकार दुर्गापूरमध्ये सर्रास घडताना दिसतोय. तरुणांच्या या नशाबाजीमुळे दुर्गापूरमधील मार्केटमध्ये अचानक फ्लेवर्ड कंडोमची विक्री वाढली असून त्याचा आता तुटवडा निर्माण होताना दिसत आहे.
असा केला जातोय कंडोमचा नशा
पश्चिम बंगालमधील दुर्गापूर या ठिकाणी या नशेचा प्रकार सध्या फेमस झाला आहे. या शहरातील युवक वेगवेगळ्या फ्लेवरचे कंडोम विकत घेतात आणि ते गरम, कडकडीत पाण्यात एक तासासाठी भिजवत ठेवतात. एक तासानंतर तेच पाणी पितात. या गोष्टीपासून नशा होत असून हा नशा जवळपास 10 ते 12 राहतो.
दुर्गापूरमध्ये विद्यार्थी संख्या मोठी
दुर्गापूरमध्ये आजूबाजूच्या अनेक ठिकाणांहून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असून ते बहुतांशी हॉस्टेलवर राहतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये नशाबाजीचे प्रमाण मोठं आहे. सिगारेट आणि दारुची नशेबाजी करण्यासाठी पैसे लागतात. त्या तुलनेत कंडोमची खरेदी कमी किमतीत होते, तसेच ते हाताळणेही सोपं राहतं. नशाबाजीसाठी कंडोमची खरेदी केली जाते ही गोष्ट अनेक दुकानदारांनी मान्य केली आहे असं हिंदी वृत्त वाहिनी आज तक ने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तात म्हटलं आहे.
कंडोमचा नशा घातक, तज्ज्ञांचा सल्ला
फ्लेवर्ड कंडोमचा नशा करणे हे शरीराला घातक असल्याचं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामध्ये विविध केमिकल्स वापरण्यात येत असल्याने त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.