(Source: ECI/ABP News/ABP Majha)
साधूंवर विश्वास ठेऊ नका, साधू नालायक असतात; विजय वडेट्टीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य
साधू आणि संत यांच्यातील फरक सांगताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. साधू आणि संत वेगळे असतात. साधूंवर विश्वास ठेऊ नका, साधू नालायक असतात, असं वादग्रस्त वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. साधू आणि संत यांच्यातील फरक सांगताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. साधू आणि संत वेगळे असतात. साधूंवर विश्वास ठेऊ नका, साधू नालायक असतात, असं वादग्रस्त वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. आपल्या वक्तव्याचा व्हिडीओ वड्डेटीवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. विजय वड्डेट्टीवार यांच्यावर भाजप अध्यात्मित आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी टीका केली आहे. साधूंची माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरं जाण्याचा इशाराही तुषार भोसले यांनी दिला आहे.
सांधूविषयी विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
साधू आणि संत यांच्यातील फरक समजावताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, संत वेगळे आणि साधू वेगळे असतात. साधूंवर अजिबात विश्वास ठेऊ नका. साधूंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत. संत समाजासाठी समर्पित होऊन काम करतात. तर साधू म्हणजे साधवून घेणारे संधी साधू असतात. चावणाऱ्या विषारी विंचूलाही जो वाचवतो ते संत असतात, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचा इशारा
साधूंना नालायक म्हणणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना मंत्री म्हणवून घेताना लाज वाटली पाहिजे. तुम्ही मंत्री झालात म्हणून तुम्हाला साधूंना शिव्या घालण्याचा परवाना मिळालेला नाही. माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की हिंदू समाजाला हे दिवस दाखवण्याकरता तुम्ही मुख्यमंत्री झाले आहात का? तुमचे मंत्रीच जर साधू-संताना शिव्या घालणार असतील तर का साधूंच्या हत्या होणार नाहीत. सोनिया गांधी हिंदू धर्म विरोधी अजेंडा राबवण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का? असा सवाल तुषार भोसले यांनी विचारला. विजय वडेट्टीवार यांनी साधूंची माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरं जा, असा इशाराही त्यांनी दिला.